मुंबई: मुंबईतील सैफी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी १० वर्षीय इराकी मुलीच्या तोंडामधील दुर्मीळ ट्युमर काढण्याची अत्यंत जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.

झाकीरा ( नाव बदलून) ही इराकची नागरिक असून गेल्या नऊ महिन्यांपासून तिच्या डाव्या गालावर सूज होती. ही सूज हळूहळू नाक, डोळ्याभोवती पसरत गेली आणि डोळा वर सरकला. पुढे ती डाव्या वरच्या जबड्यातून तोंडामध्ये पसरत गेली. या आजारासाठी तिच्या वडिलांनी देश-विदेशातील अनेक डॉक्टरांकडे उपचार शोधले पण कोणतेच योग्य निदान मिळाले नाही. यामुळे त्यांनी मुलीच्या उपचाराची सर्व आशा गमावली होती.

हेही वाचा – म्हाडा बृहतसूची सोडत गैरप्रकार : एक वर्षानंतरही सोडतीचा चौकशी अहवाल गुलदस्त्यात

या मुलीला दोन आठवड्यांपूर्वी मुंबईच्या सैफी हॉस्पिटलमध्ये प्लॅस्टिक सर्जन डॉ. मुर्तजा रंगवाला यांच्या देखरेखीखाली दाखल करण्यात आले. त्यावेळी तिच्या तोंडावर ट्युमर मोठ्या प्रमाणात बाहेर आले जे अतिसंवेदनशील झाले होते आणि त्याला स्पर्श झाल्यास रक्तस्रावही होत होता. या ट्युमरमुळे तिच्या तोंडाचा ९० टक्के भाग व्यापला गेला होता आणि ती काहीच खाऊ-पीऊ शकत नव्हती. यामुळे ती कुपोषित आणि अशक्त झाली होती.

डॉ. रंगवाला यांनी एमआरआय स्कॅन केल्यावर असे आढळले की मागील दोन महिन्यांत ट्युमर १० पटीने वाढला होता आणि हाडांमध्ये पसरत होता. चेहऱ्याचा डावा भाग पूर्णपणे विस्कळीत झाला होता. डोळा, नाक, ओठ आणि दात बाहेर सरकले होते. बायोप्सीद्वारे ट्युमर कर्करोगी नसल्याचे निष्पन्न झाले. अन्य तज्ज्ञ डॉक्टरांकडूनही यावरील उपायांचा सखोल विचार झाला. शेवटी शस्त्रक्रिया हाच एक पर्याय उरला होता, अन्यथा मुलीचे प्राण धोक्यात आले असते.

त्यानंतर ७ डिसेंबर रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेमध्ये अनेस्थेशिया देणे खूप आव्हानात्मक होते. तोंड उघडू शकत नसल्यामुळे मानेवर चीर देऊन ट्रेकिओस्टॉमीद्वारे अनेस्थेशिया द्यावे लागले असते. मात्र डॉ. माजिद सय्यद यांनी तोंडातून सुरक्षित अनेस्थेशिया दिला आणि कोणतीही चीर न देता काम केले. यानंतर डॉ. रंगवालांनी ट्युमर पूर्णपणे काढण्यासाठी तोंडाच्या आतील भागावर चीर देत शस्त्रक्रिया केली. डाव्या गालाचा हाडाचा भाग, डोळ्याच्या खालचा भाग, नाकाचा बाजूचा भाग आणि वरचा जबडा शस्त्रक्रियेदरम्यान काढून टाकण्यात आला.

हेही वाचा – बीकेसी मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुला, पूर्व द्रुतगती महामार्ग ते बीकेसी प्रवास वेगवान

याबाबत डॉ. मुर्तजा रंगवाला म्हणाले, “ही शस्त्रक्रिया खूप आव्हानात्मक होती कारण ट्युमर संपूर्णपणे तोंडामधून काढणे आणि चेहऱ्यावर कोणतीही चिर न देणे आवश्यक होते. शस्त्रक्रियेनंतर मुलीला दोन दिवस आयसीयूमध्ये ठेवले गेले आणि नंतर पाच दिवस सामान्य वॉर्डमध्ये निरीक्षणाखाली ठेवले गेले.

आता झाकीरा पूर्णपणे बरी झाली असून तीला हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली आहे. ती आता व्यवस्थित खाणे, बोलणे आणि पिणे करू शकते.

Story img Loader