वडाळा येथील डॉन बॉस्को शेल्टर होममध्ये राहणाऱ्या १४ वर्षीय मुलाने सोमवारी आत्महत्या केली. अनोळखी व्यक्तीबरोबर वाद झाल्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी, असे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे. मात्र, मुलाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा संशय त्याच्या आईने व्यक्त केला आहे. मुलाच्या आईने डॉन बॉस्को शेल्टर होमविरोधात माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा >>> मुंबई : म्हाडा भरती परीक्षा निकाल जाहीर
नायगावमधील क्रॉस रोड येथील डी. बी. कुलकर्णी शाळेत इयत्ता नववीमध्ये हा मुलगा शिक्षण घेत होता. तो वडाळा येथील डॉन बॉस्को शेल्टर होममध्ये राहत होता. या मुलाची आई सफाई कामगार असून ती नरिमन पॉईंट परिसरात पदपथावर राहत होती. दर १५ दिवसानी त्याची आई त्याला भेटायला येत होती. शेल्टर होममधील शौचालयात सोमवारी सायंकाळी ७ च्या सुमारास गळफास लावलेल्या स्थितीत हा मुलगा आढळला. त्याला तात्काळ शीव रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुलाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्या आईने डॉन बॉस्को शेल्टर होमविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे माटुंगा पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्यांनी सांगितले.