‘माहिती आणि प्रसारण मंत्रालया’ने चर्चेची तयारी दाखवल्यानंतर ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांनी आपले १८ दिवसांचे उपोषण मागे घेतल्यानंतर मंगळवारी मुंबईत ‘फिल्म डिव्हिजन’च्या कार्यालयात विद्यार्थी आणि अधिकारी यांच्यात चर्चा झाली. सकाळी झालेल्या या पहिल्या बैठकीनंतर पुन्हा एकदा १ ऑक्टोबरला चर्चेसाठी एकत्र येण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
‘एफटीआयआय’चे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू क रून चार महिने उलटल्यानंतरही सरकारकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनीही विद्यार्थ्यांशी चर्चा करून सरकारने लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा, अशी भूमिका पत्राद्वारे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे व्यक्त केली होती.
सगळीकडून दबाव आल्यानंतर मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याची तयारी दाखवल्यानंतर विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतले होते. ठरल्यानुसार माहिती आणि प्रसारण खात्याचे अधिकारी आणि विद्यार्थी यांची पहिली बैठक पार पडली.
यात सात विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या बैठकीत विद्यार्थ्यांनी आपल्या दोन प्रमुख मागण्या अधिकाऱ्यांसमोर ठेवल्या. सध्याची ‘एफटीआयआय’ सोसायटी बरखास्त करून त्याऐवजी टप्प्याटप्प्याने नव्या शोध समितीची नियुक्ती केली जावी. जेणेकरून संस्थेचे अध्यक्ष, सदस्य आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती अधिक पारदर्शीपणाने होईल. त्याचबरोबर ‘एफटीआयआय’ला ‘आयआयटी’ आणि ‘आयआयएम’ संस्थांप्रमाणे प्रमुख राष्ट्रीय संस्थेचा दर्जा देण्यात यावा. त्यामुळे ‘एफटीआयआय’चे संचालक म्हणून कोणाही राजकीय व्यक्तीची वर्णी लावली जाणार नाही, असे विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या मांडताना सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा