ऑक्टोबरआधीच सुरू झालेल्या उन्हाच्या तडाख्याने मुंबईकरांना शतकातील सर्वाधिक तापदायक सप्टेंबर अनुभवावा लागत आहे. सांताक्रूझ येथे सोमवारी ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून हे सप्टेंबरमधील १०० वर्षांतील सर्वाधिक तापमान आहे.
पाऊस जाण्यासाठी जणू टपून बसलेल्या उन्हाने मुंबई आणि परिसराचा ताबा घेण्यास सुरुवात केली. त्यातच हवेतील बाष्प एकदम कमी झाल्याने तापमानवाढीवर नियंत्रण राहिले नाही. जमिनीवरून येत असलेल्या वाऱ्यांमुळे तापमान वाढायला अधिक मदत झाली. शनिवारी ३५.३ अंश से., रविवारी ३५.६ अंश से. तर सोमवारी थेट ३७ अंश से. तापमानाची नोंद झाली. सप्टेंबर हा पावसाचा निरोपाचा महिना मानला जातो. साधारणत: पावसाने पाय मागे घेतल्यावर ऑक्टोबरमध्ये मुंबईतील तापमान वाढते. मात्र यावेळी पावसाचा प्रभाव सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात कमी झाल्याने ऑक्टोबर हीटने लवकर प्रवेश केला आहे.
हा ऋतू बदलण्याचा काळ आहे. त्यामुळे वाऱ्यांची दिशा सतत बदलत राहते. समुद्रावरून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे शहराचे  तापमान नियंत्रणात राहते. मात्र आता जमिनीवरून आग्नेय दिशेनेही वारे येत आहेत. त्यामुळे तापमान वाढत आहे. त्यातच मान्सूनच्या वाऱ्यांमुळे हवेत गेले काही महिने असलेले बाष्पही अचानक कमी झाले आहे, असे मुंबई हवामानशास्त्र विभागाचे संचालक व्ही. के. राजीव म्हणाले. पुढील काही दिवस परिस्थितीत फारसा बदल होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी ऑक्टोबरचाही विक्रम मोडणार?
गेल्या दशकभरात २०१०चा अपवाद वगळता सप्टेंबरमध्ये कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस दरम्यान राहिले होते. यापूर्वी सप्टेंबरमधील सर्वाधिक तापमान २३ सप्टेंबर १९७२ रोजी ३६.४ अंश से. नोंदले गेले. ऑक्टोबर महिन्यातील सर्वाधिक तापमान २३ ऑक्टोबर १९७२ रोजी ३७.९ अंश से. नोंदले गेले. हे दोन्ही दिवस एकाच वर्षांतील आहेत. तसेच यावर्षी, १० जून रोजी ३८ अंश से. तापमानाची नोंद झाली. हे तापमानही जूनमधील शतकातील सर्वाधिक तापमान होते. यावेळची तापमानाची एकूण स्थिती पाहता ऑक्टोबर महिन्यात तापमानाच्या नव्या विक्रमाची नोंद होणे अगदीच अशक्य नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai temperature at 37 degrees in september