उत्तरेकडे पसरलेल्या थंडीला मुंबईचा पल्ला गाठायला अजूनही वेळ असला, तरी गारव्याचा जम बसू लागला आहे. ‘मॉर्निग वॉक’साठी भल्या पहाटे घराबाहेर पडणाऱ्यांच्या अंगावर स्वेटर आणि कानावर मफलर दिसू लागले आहेत. नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवडय़ात २० अंश सेल्सिअसखाली आलेले तापमान डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी १८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले. येत्या काही दिवसांत तापमानात फार घट होण्याची शक्यता नसली, तरी वर्षभर मुंबईकरांची साथसंगत करणाऱ्या घामाच्या धारांनी निरोप घेतल्याने मुंबईकर सुखावले आहेत.
नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवडय़ात नोंदले गेलेले १८.२ अंश सेल्सिअस हे तापमान गेल्या महिन्यातील सर्वात किमान तापमान होते. डिसेंबरमध्ये, विशेषत: शेवटच्या आठवडय़ात तापमान ११ ते १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरण्याचा अनुभव गेल्या चार-पाच वर्षांत आला आहे. त्यामुळे सोमवारी सांताक्रुझ येथे नोंदवले गेलेले १८ अंश सेल्सिअस तापमान फारशी दखल घेण्यासारखे नसले, तरी सोमवारच्या थंडीमुळे या वेळच्या लहरी पावसाळ्यानंतर किमान थंडीची सुरुवात व्यवस्थित झाल्याचा दिलासा मिळाला. दरवर्षीप्रमाणे नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवडय़ात गारवा स्थिरावण्यास सुरुवात झाली आहे.
राज्याच्या अंतर्गत भागांत थंडीने जम बसवला असून नाशिक आणि पुणे या शहरांचे किमान तापमान ११ ते १२ अंश सेल्सिअस एवढे राहत आहे. विदर्भातही १३ ते १४ अंश सेल्सिअस एवढय़ा किमान तापमानाची नोंद होत आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांतही तापमान दोन दिवसांत आणखी कमी होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. मुंबईतील ढगाळ वातावरण मंगळवारी कमी होणार असून निरभ्र आकाशामुळे गारवा अधिक वाढू शकेल.

तापमान
(अंश से.मध्ये)
१ डिसें        १८
३० नोव्हें    १८.२
२९ नोव्हें    १९
२८ नोव्हें    १८.७
१७ नोव्हें    १८.२