मुंबई : मुंबईत गारठा जाणवू लागला असून, बुधवारी तापमापकावरही पारा २० खाली घसरला. मुंबईत यंदाच्या हंगामात प्रथमच २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. मात्र, कमाल तापमानाचा पारा ३० अंशापेक्षा अधिक असल्याने दिवसा मात्र उकाडा कायम आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील नागरिकांना पहाटे गारवा आणि दुपारी उकाडा अशा हवामानाला तोंड द्यावे लागत आहे. किमान तापमानात घसरण झाली असली तरी सध्या कमाल तापमानाचा पारा चढाच आहे.
हेही वाचा >>> रिझव्र्ह बँकेचा राज्यांना इशारा, पण महाराष्ट्राची वित्तीय स्थिती समाधानकारक !
हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी किमान २१.५ अंश सेल्सिअस तर कमाल ३०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ केंद्रात किमान १९.४ अंश तर कमाल ३२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दोन्ही केंद्रांवर किमान तापमान मंगळवारपेक्षा १ अंशाने कमी होते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार दिवस मुंबईतील कमाल तापमानात फारसा फरक जाणवणार नाही. मुंबईमध्ये आग्नेय दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानात फारशी घट झालेली नाही. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये थंडी जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र, कमाल तापमानात जानेवारीपर्यंत घट होण्याची शक्यता नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.