मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा चढा राहिल्याने मुंबईकर हैराण झाले होते. मात्र, मुंबईच्या कमाल तापमानामध्ये सोमवारी घट झाली. सांताक्रूझ आणि कुलाबा या दोन्ही केंद्रांवर सोमवारी नेहमीपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. दरम्यान, तापमानातील घट पुढील दोन ते तीन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
किमान तापमानात झालेली घट स्थिर राहिल्याने, तर दुसरीकडे कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने मागील अनेक दिवसांपासून मुंबईकरांना रात्री काहीसा गारवा आणि दिवसभर उकाडा अशा विचित्र वातावरणाचा सामना करावा लागत होता. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी २८ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३०.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. याचबरोबर कुलाबा येथे १९.६ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ येथे १६.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. कमाल तापनामात सोमवारी काही अंशी घट झाल्याने मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या उत्तरेकडून वारे येत असल्यामुळे कमाल तापमानात घट झाली आहे. ही घट पुढील दोन ते तीन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हेही वाचा >>>दादर-रत्नागिरी सुरू करण्यासाठी प्रवासी एकवटले, कोकणात जाणारी गाडी बंद करून यूपीची गाडी
दरम्यान, राज्यातील तापमानात देखील चढउतार सुरू आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे थंडी वाढायला मदत होणार आहे. राज्याच्या किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मुंबईची हवा ‘मध्यम’ श्रेणीत
मुंबईची हवा गुणवत्ता खालावल्यामुळे मुंबई महापालिकेने कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानंतर, मुंबईतील काही भागातील हवा गुणवत्तेत सुधारणा झाली. मात्र, काही भागातील हवा गुणवत्तेत काहीच फरक पडलेला नाही. समीर अॅपच्या नोंदीनुसार सोमवारी मुंबईची हवा ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली गेली. गोवंडीतील शिवाजीनगर येथील हवा मात्र ‘वाईट’ श्रेणीतच नोंदली गेली. तेथील हवा निर्देशांक सायंकाळी २३८ इतका होता. गोवंडी शिवाजीनगरमधील हवा मागील दोन महिन्यांपासून अनेकदा वाईट श्रेणीत नोंदली गेली आहे. तेथे पीएम २.५ धुलीकणांची मात्रा अधिक होती. त्यामुळे, शिवाजीनगर परिसरातील स्थानिकांना आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. समीर अॅपच्या नोंदीनुसार, सोमवारी बोरिवली येथे समाधानकारक हवेची नोंद झाली. तेथील हवा निर्देशांक ९५ होता. तर, भायखळा (११३), कुलाबा (१०९) आणि घाटकोपर येथील (१८५) हवा निर्देशांक होता.