गेल्या महिन्याभरापासून तापमानात होत असलेले चढउतार आता थांबले असून तापमापकातील पारा केवळ खालच्या दिशेला घसरू लागला आहे. बुधवारी मुंबईत १७.३ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले असून या मोसमातील हे सर्वात कमी तापमान आहे. वायव्येकडून येत असलेल्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने राज्यात थंडीची लाट आली असून तापमानात आणखी घट होईल.
रविवारपासून तापमान घसरण्यास सुरूवात झाली आहे. रात्री तसेच सकाळी गार वाऱ्यांमुळे किमान तापमान १८ अंश सेल्सिअसवर आले होते. बुधवारी ते १७.३ अंश से. वर आले. अफगाणिस्तानच्या दिशेने येत असलेल्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. हे वारे महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्याने अंतर्गत भागातही पारा गोठणबिंदूकडे सरकायला सुरुवात झाली आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या मडी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे थंड वारे राज्यापर्यंत पोहोचण्यात अडथळे येतील, असा अंदाज होता. ‘या वादळाचा प्रभाव ओसरला आहे. त्यामुळे उत्तरेकडून येत असलेले थंड वारे दक्षिणेपर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती
मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिली.
डिसेंबर महिन्यातील
सर्वात कमी तापमान
२०१२- १३.७ (२९)
२०११- ११.४ (२७)
२०१०- १३.४ (२३)
२००९- १३.४ (३१)
२००८- १२.८ (३१)
२००७- १३.८ (२९)