मुंबई : मागील दोन ते तीन दिवस मुंबई शहर, तसेच उपनगरांत उकाडा कमी झाला आहे. मुंबईतील किमान, तसेच कमाल तापमानातही अधूनमधून घट झाली होती. यामुळे पहाटे गारवा जाणवू लागला आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस मुंबईतील कमाल आणि किमान तापमानातही वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पूर्वेकडील वाऱ्यांमुळे किमान आणि कमाल तापमानात वाढ होणार आहे. या कालावधीत कमाल तापमान पुन्हा ३५ -३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४-२६ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. तसेच वातावरणात आर्द्रता अधिक असल्याने दिवसभर उकाडा जाणवेल. यानंतर दोन दिवसांनी पुन्हा तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, मागील तीन – चार दिवस मुंबईतील किमान तापमानात घट झाल्यामुळे पहाटे गारवा जाणवू लागला आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी ३३.८ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३६.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ केंद्रात मंगळवारच्या तुलनेत बुधावारी कमाल तापमान १ अंशाने अधिक नोंदले गेले.
मुंबईत बुधवारी दुपारीही दिलासादायक वातावरण होते. दरम्यान, पुढील दोन दिवस कमाल तापमानात वाढ होणार असल्यामुळे, तसेच वातावरणातील आर्द्रतेमुळे उकाडा जाणवेल.