गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कोकणाकडे पावसाने पाठ फिरवल्याने शहराच्या तापमानामध्ये कमालीची वाढ झालीय. भारतीय हवामान खात्याचे उप महासंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच तोंड फिरवल्याने मुंबईचं तापमान ऑगस्टमध्येच वाढताना दिसत आहे. मागील तीन दिवसांमध्ये मुंबईचं तापमान सात अंशांचा फरक पडल्याचं होसाळीकर यांनी म्हटलं आहे.
होसाळीकर यांनी ट्विटरवरुन एक आलेख पोस्ट केलाय. यामध्ये त्यांनी मागील तीन दिवसांमध्ये सांताक्रुझ येथील हवामानखात्याच्या वेधशाळेत मुंबईतील तापमान वाढल्याची नोंद करण्यात आल्याचं म्हटलं आहे. आज सकाळी साडे अकराच्या सुमारास मुंबईतील तापमान ३३ अंशांवर पोहचल्याचंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबईतील तापमान हे २६ अंशांपर्यंत होतं. मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने निरभ्र आकाश दिसून येत असून तापमानातही वाढ झाल्याचं होसाळीकर म्हणालेत. मुंबईतील किमान तापमानामध्ये एका अंशांनी वाढ झालीय.
Pl see changes in temperature profile in last 3 days in Mumbai recoded by AWS Santacruz.Clear increase in temp trend & today its already near 33°C at 11.30 am
Just 2 days back Tmax in Mumbai was around 26°C.With stopping of rains, almost blue sky, temp on rise.
Pl see IMD updates pic.twitter.com/NviyWsh3f2— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 23, 2021
२० ऑगस्ट ते २ सप्टेंबर या काळात मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. ऑगस्टच्या प्रारंभापासूनच मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाने उघडीप दिली. कडक ऊन आणि अधूनमधून येणारी एखादी हलकी सर अशा वातावरणामुळे तापमानही वाढले आहे. मुंबई उपनगरात काही दिवसांपूर्वी २६.५ अंश सेल्सिअस किमान, तर ३१.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. दोन्हींमध्ये सरासरीच्या तुलनेत २ अंशांची वाढ दिसून आली. मुंबई शहर भागात आणि रत्नागिरी येथेही कमाल तापमानात २ अंशांची वाढ काही दिवसांपूर्वीच झाली असून आता ही वाढ अधिक असल्याचं स्पष्ट होत आहे.
अंदाज काय?
जून व जुलै या सलग दोन महिन्यांत सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला. ऑगस्टचे पहिले २० दिवस कोरडे गेले असतानाच पाऊस पुन्हा परतण्याची आशा निर्माण झाली आहे. २० ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असे हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुत्ये यांनी सांगितलं आहे.