मुंबई : मागील दोन दिवसांपासून मुंबईच्या कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रातील तापमानाचा पारा ३४ अंशावर पोहोचला होता. दरम्यान, पुढील दोन – तीन दिवस मुंबईच्या कमाल तापमानातील वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात सोमवारी ३४.५ अंश सेल्सिअस, तर कुलाबा केंद्रात ३३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दोन्ही केंद्रावरील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदले गेले. यापूर्वी ४ डिसेंबर रोजी कुलाबा केंद्रात ३७.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. हा दिवस १६ वर्षांतील सर्वात उष्ण दिवस ठरला होता. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद सोमवारी रत्नागिरी जिल्ह्यात झाली. तेथे ३५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पुढील दोन – तीन दिवस कमाल तापमान चढे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हेही वाचा >>>नववर्षाच्या स्वागतासाठी बेस्टच्या विशेष बस

काही दिवस अगोदर राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले होते. मात्र, पावसाळी वातावरण निवळल्याने तापमानात चढ – उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे आग्नेय अरबी समुद्रापासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे सध्या उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडी कमी झाली आहे. पुढील काही दिवसांत राज्यातील किमान तापमानात घट होऊन पुन्हा थंडी पडू शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, समीर ॲपच्या नोंदीनुसार मुंबईतील हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाचा स्तर सोमवारी ‘मध्यम’ श्रेणीत नोंदला गेला. मात्र तब्बल एक महिन्यांनी काही भागात ‘समाधानकारक’ हवेची नोंद झाली आहे.

हेही वाचा >>>३, ४ जानेवारीदरम्यान ‘लोकसत्ता स्वरांजली २०२५’; पं. अजय चक्रवर्ती, शुभा मुद्गल, पं. रोणू मजुमदार, कलापिनी कोमकली, पं. पुर्बायन चॅटर्जी यांचा सहभाग

हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या समीर ॲपच्या नोंदीनुसार, सोमवारी सायंकाळी मुंबईचा हवा निर्देशांक ११२ इतका होता. गेला एक महिना मुंबईची हवा गुणवत्ता खालावलेली आहे. अनेक भागात सातत्याने ‘अतिवाईट’ ते ‘वाईट’ हवेची नोंद झाली. नोव्हेंबर – डिसेंबरदरम्यान अनेकदा मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम असल्याचे दिसून आले. या कालावधीत मुंबईतील सरासरी निर्देशांक १५० ते २०० पर्यंत होता. समीर ॲपनुसार सोमवारी बोरिवली (७६), कुलाबा (८५), भांडूप (८२), कुर्ला (९७), माझगाव (८४), मुलुंड (९६), तर वरळी येथे (९८) हवा निर्देशांक होता. म्हणजेच या भगातील हवा ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदली गेली. वरील बहुतांश भागातील हवा गेला महिनाभर ‘वाईट’ ते ‘अतिवाईट’ श्रेणीत नोंदली जात होती.

प्रदूषण मापनासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची १४ केंद्रे, भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था, पुणे यांची ९ केंद्रे तर पालिकेची ५ केंद्रे मुंबईत स्थापित करण्यात आली आहेत. या केंद्रावरील नोंदीनुसार नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून हवेचा दर्जा खालावल्याचे दिसून आले होते. मुंबईतील काही भागात अतिवाईट हवेची नोंद झाली. वातावरणातील घातक पीएम २.५ आणि पीएम १० धूलीकणांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले.

मुंबई शहरात धुलीकणांचे दिवसेंदिवस वाढते प्रमाण लक्षात घेऊन मुंबई महापालिका तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई देखील करण्यात आली.