मुंबई : मध्य रेल्वेवरील आंबिवली – टिटवाळा स्थानकांदरम्यानच्या समांतर रस्ता फाटकाला (लेव्हल क्रॉसिंग गेट) बुधवारी सकाळी टेम्पोने धडक दिली. या घटनेमुळे रेल्वे फाटकाचे प्रचंड नुकसान झाले असून लोकल सेवेवरही परिणाम झाला. मध्य रेल्वेवरील लोकल दुपारीही ३० मिनिटे विलंबाने धावत होत्या. त्यामुळे अप आणि डाऊन लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना असह्य उकाडा आणि विलंबाने धावणाऱ्या लोकलचा फटका प्रवाशांना बसला.

आंबिवली-टिटवाळा येथील रेल्वे फाटक क्रमांक ४८ ला बुधवारी सकाळी ८.२० च्या सुमारास एका टेम्पोने जोरदार धडक दिली. चालकाच्या निष्काळजीपणे आणि गेटमनने दिलेल्या सूचनांचे पालन न केल्याने ही घटना घडली. त्यात रेल्वे फाटकाचे प्रचंड नुकसान झाले. या घटनेचे वृत्त समजताच रेल्वे अधिकारी, कर्मचारी, आरपीएफ विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी टेम्पो चालक छगन भोईर यांंना टेम्पोसह आरपीएफ पोलीस ठाणे, टिटवाळा येथे आणले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून टेम्पो चालकाला अटक करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) अधिकाऱ्याने दिली.

समांतर रस्ता फाटकावर (लेव्हल क्रॉसिंग गेट) रस्ते वाहतूक जादा वेळ सुरू राहिल्याने लोकल विलंबाने धावतात. याबाबत मध्य रेल्वेच्या संबंधित विभागाकडून वारंवार समाज माध्यमावर माहिती दिली जाते. रेल्वे फाटकाला बुधवारी टेम्पोची धडक दिली. त्यानंतर काही काळ रेल्वे फाटक खुले होते. त्यामुळे लोकल, लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या खोळंबल्या होत्या. त्यानंतर, उपाययोजना करून लोकल सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, दुपारपर्यंत लोकल ३० मिनिटे उशिराने धावत होत्या.

मध्य रेल्वेवरून दररोज १,८१० लोकल फेऱ्या धावत असून या लोकलमधून सुमारे ३९ लाख प्रवासी प्रवास करतात. तर, मध्य रेल्वेवरून दररोज ६६ वातानुकूलित लोकल धावत असून यामधून दररोज सुमारे ७६,८३६ प्रवासी प्रवास करतात. मात्र, यापैकी बहुसंख्य लोकल फेऱ्या रद्द होतात. तर, अनेक लोकल उशिराने धावतात. रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षातील जानेवारी २०२५ पर्यंत सुमारे ३५ हजार लोकल फेऱ्या विलंबाने धावल्या. तर, २०२३-२४ मध्ये जानेवारी २०२४ पर्यंत सुमारे २९ हजार लोकल विलंबाने धावल्या. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सुमारे ६ हजारांहून अधिक लोकल विलंबाने धावल्या.

Story img Loader