मुंबई : दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेवरील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच आता या दोन्ही मार्गिकेवरील प्रवाशी संख्येने आता दहा कोटींचा पल्ला गाठला आहे. एप्रिल २०२२ ते मे २०२४ या कालावधीत या दोन्ही मार्गिकेवरुन दहा कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेतील दहिसर ते डहाणुकरवाडी-आरे असा २० किमीचा पहिला टप्पा एप्रिल २०२२ मध्ये सेवेत दाखल करण्यात आला आहे. तर जानेवारी २०२३ मध्ये दुसरा टप्पा सेवेत दाखल झाला आणि दहिसर ते अंधेरी पश्चिम अशी मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली अशी मेट्रो ७ मार्गिका कार्यान्वित झाली. दरम्यान मेट्रो २ अ आणि ७ चा पहिला टप्पा सेवेत दाखल झाल्या त्या दिवशी अर्थात पहिल्या दिवशी या मार्गिकेवरुन ५५ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. तर यातून ११ लाख रुपयांचा महसूल मिळाला होता. तर पहिला टप्पा सेवेत दाखल झाल्यानंतर पहिल्या पाच महिन्यात म्हणजेच सप्टेंबर २०२२ मध्ये एकूण प्रवाशी संख्या ५० लाखांच्या घरात गेली होती. हळूहळू या पहिल्या टप्प्याला प्रतिसाद वाढत गेला आणि जेव्हा पूर्ण क्षमतेने अर्थात दहिसर ते अंधेरी पश्चिम (मेट्रो २ अ) आणि दहिसर ते गुंदवली (मेट्रो ७) या दोन्ही मार्गिका धावू लागल्या त्यावेळी प्रवाशी संख्येत लक्षणीय वाढ होण्यास सुरुवात झाल्याची माहिती महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाकडून (एमएमएमओसीएल) देण्यात आली आहे.
एमएमएमओसीएलवर या दोन्ही मार्गिकेच्या संचलन आणि देखभालीची जबाबदारी आहे. एप्रिल २०२२ ते एप्रिल २०२३ या कालावधील अर्थात एका वर्षात दोन कोटी प्रवाशांनी या मार्गिकेवरुन प्रवास केला होता. त्यानंतर प्रवाशी संख्येत मोठी वाढ होऊ लागली आणि मे २०२३ ते जून २०२३ दरम्यान, केवळ ६० दिवसांत या मार्गिकेवरुन एक कोटी प्रवाशांनी प्रवास केला आणि दोन कोटींची एकूण प्रवाशी संख्या थेट तीन कोटींवर गेली. तर आता या मार्गिकेवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येने दहा कोटींची संख्या पार केली आहे. एप्रिल २०२२ ते २०२४ दरम्यान दहा कोटी प्रवाशांनी मेट्रो २ अ आणि ७ वरुन प्रवास केला आहे. यावर एमएमआरडीए आणि एमएमएमओसीएलने समाधान व्यक्त केले आहे. दिवसाला दोन लाख ३० हजार ते दोन लाख ४० हजार प्रवाशी या मार्गिकेवरुन प्रवास करताना दिसत आहेत. तर यात आणखी वाढ कशी होईल यादृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे एमएमएमओसीएलकडून सांगण्यात येत आहे.