सदफ मोडक

Mumbai 26/11 Attacks: पंधरा वर्षांपूर्वी मुंबई शहरावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात १९७ नागरिकांचा मृत्यू झाला तर शेकडोजण जखमी झाले. या हल्ल्याचे व्रण मुंबईकरांच्या मनात अजूनही ताजे आहेत. या हल्ल्याने मुंबई शहरात अनेक गोष्टी बदलल्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या गजबजलेल्या स्थानकात सहकाऱ्याला सोडण्यासाठी आलेल्या सदाशिव कोळके यांना गोळी लागली. ते वाचले पण या हल्ल्याने त्यांचं जीवनच बदलून गेलं. इंडियन एक्स्प्रेस समूहातर्फे प्रकाशित ‘स्टोरीज ऑफ स्ट्रेंथ’ या पुस्तकात आक्रीत स्वरुपाच्या या घटनेने सदाशिव यांंचं आयुष्य कसं बदलून गेलं याचा घेतलेला धांडोळा.

BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
house damaged by falling tree branch in goregaon
गोरेगावमधील झाडाची फांदी पडून घराचे नुकसान
in pune Karvenagar area drunk gang attacked youth due petty dispute
कर्वेनगरमध्ये मद्यपींकडून तरुणावर हल्ला, तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गु्न्हा
man murder over property dispute, Mumbai ,
मुंबई : मालमत्तेच्या वादातून ३६ वर्षीय व्यक्तीची हत्या, दोघांना अटक
diarrhea, Badlapur, girl died diarrhea Badlapur,
अतिसाराने चिमुकलीचा मृत्यू, बदलापुरातील दुर्दैवी घटना, अंधश्रद्धेचा संशय
Indraraj alias Raju alias Bhim has been arrested by Ghaziabad Police
हरवलेला मुलगा ३० वर्षांनी घरी परतला; आईनं प्रेमानं खाऊ घातलं, पण अखेर बिंग फुटताच बसला आश्चर्याचा धक्का
pune crime news
पुणे : कल्याणीनगर भागांतील हॉटेलमध्ये धांगडधिंगा, हॉटेल मालकांवर गुन्हे

सदाशिव कोळके छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळच्या क्रॉफर्ड मार्केट इथल्या एका हॉटेलात कामाला होते. ज्यादिवशी डोक्यावर छप्पर नसे तेव्हा ते स्टेशनवरच झोपायचे. गरिबीमुळे सदाशिव यांना शाळा सोडावी लागली. अगदी लहान वयापासूनच त्यांना काम करावं लागलं. हातातोंडाची गाठ पडताना कठीण होत असे. याच ओढाताणीवर पर्याय म्हणून सदाशिव यांनी मुंबई गाठली.

त्या काळ्या रात्री जेव्हा अजमल कसाब आणि अबू इस्माईल यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात घुसून अंदाधुंद गोळीबार केला तेव्हा सदाशिव यांनाही गोळी लागली. मानेजवळ लागलं पण जीव वाचला. सदाशिव तेव्हा सीएसटी स्थानकाजवळच्या स्वस्तिक लंच होम इथे कामाला होते. तेरा वर्षांचे असल्यापासून सदाशिव मुंबईत आले आणि तेव्हापासून शहरातल्या अनेक हॉटेलांमध्ये काम केलं. त्यांचं कुटुंब म्हणजे त्यांच्याबरोबर हॉटेलात काम करणारे सहकारी. ते सांगतात, ‘त्यांच्यापैकी एक जण गावी चालला होता. त्याच्याकडे बरंच सामान होतं. दहा वाजायच्या बेतात आम्ही स्टेशनवर गाडीची वाट पाहत होतो. तेवढ्यात आम्ही गोळीबाराचा आवाज ऐकला आणि एकदम गलका उडाला. लोक सैरावैरा पळू लागले. काय होतंय काहीच कळलं नाही. मी आणि माझा मित्र विखुरलो. जो तो जीव वाचवण्यासाठी पळू लागला. मीही धावायचा प्रयत्न करू लागलो तेवढ्यात माझ्या मानेच्या इथे काहीतरी येऊन आदळलं आणि मी पडलो. आजूबाजूला रक्ताचा सडा होता. मला हॉस्पिटलमध्ये कोणी नेलं कळलं नाही. मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी ज्या हॉटेलात काम करायचो त्याचे मालक समोर होते’. पोलिसांनी सदाशिव यांच्या फोनमधून हॉटेलमालकांचा नंबर मिळवला आणि संपर्क केला. गोकुळादास तेजपाल हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं.

सदाशिव यांचं गाव कोल्हापूर जिल्ह्यात. त्यांच्या घरच्यांना कळवण्यात आलं. ‘माझी बायको, आईवडील आणि मुलांना धक्काच बसला. मला बघायला येतो म्हणून त्यांनी धोशाच लावला. पण मी ज्या हॉटेलात काम करायचो तिथेच राहायचो. घरचे आले तर त्यांची राहायची व्यवस्था कुठे करणार असा प्रश्न होता. घरचे असते तर बरं झालं असतं पण माझी अडचण वेगळीच होती. पैशाचाही प्रश्न होता. त्यांचा मुंबईला येण्याचा खर्चही मला परवडण्यासारखा नव्हता’.

सदाशिव आता ४३ वर्षांचे आहेत. जेजे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर काही शस्त्रक्रिया झाल्या. तिथे असताना हॉटेलमधले सहकारी आणि मालकांनी त्यांची काळजी घेतली. चालताफिरता येऊ लागल्यानंतर सदाशिव बस पकडून गावी गेले. डॉक्टरांनी त्यांना सहा महिन्यांची सक्त विश्रांती सांगितली होती.

सदाशिव यांचं मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातलं ठाणेवाडी. उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे शेतीचा लहानसा तुकडा. खाणारी तोंडं बरीच. भाताची शेती होती पण तेवढं घर चालवायला पुरेसं नव्हतं. यामुळे सदाशिव यांना दुसरीत असतानाच शाळा सोडावी लागली. आठ वर्षांचे असल्यापासून त्यांनी शेतमजूर म्हणून काम करायला सुरुवात केली. घरच्यांना जेवढी मदत होईल तेवढी ते करायचे. मोठ्या शेतात काम करुन थोडे पैसे मिळायचे. घरातली बाकी मुलंही काम करु लागली होती. पण सगळ्यांना पुरेल एवढं धनधान्य नसायचं. पैसे अपुरे पडू लागले तसं सदाशिव १३व्या वर्षी मुंबईला आले. तीन दशकांपूर्वी नातेवाईकांच्या साथीने त्यांनी मुंबई गाठली होती. गावात राहणाऱ्या सदाशिवसाठी कोल्हापूर हेच मोठं शहर. मुंबईसारख्या मोठ्या शहराची त्यांनी कल्पनाही केली नव्हती.

त्या दिवसांच्या आठवणी सदाशिव सांगतात, ‘क्रॉफर्ड मार्केटजवळच्या हॉटेलात मला काम मिळालं. टेबलं साफ करणं आणि भांडी घासणं हेच माझं काम होतं. काम आटोपलं की मी तिथेच झोपत असे. मुंबई प्रचंड वेगाने धावायची. हे शहर प्रचंड वाटायचं. हॉटेलात काम करता करता दिवस कधी संपून जायचा कळायचंच नाही. पण रात्री गावची आणि घरच्यांची प्रचंड आठवण यायची. मी रडायचो. घरी परत जावं वाटायचं. पण तिथे जाऊन काय काम करणार, पैसे कुठून कमावणार हा प्रश्न उभा राहायचा. दीडशे रुपये माझा पहिला पगार होता. त्यापैकी बरेचसे पैसे मी गावी पाठवायचो. आईची खूपच आठवण आली तर बरोबर काम करणाऱ्या पत्र लिहायला सांगत असे. आमच्या गावी तेव्हा फोन नव्हता. मी नियमितपणे पत्र पाठवायचो पण कधीही उत्तर यायचं नाही. पण एकटेपणा घालवण्यासाठी पत्र पाठवत राहिलो’.

‘मी कामावर लक्ष केंद्रित केलं. कामाचा कधी कंटाळा केला नाही. बरोबरच्या लोकांकडून मी खूप गोष्टी शिकलो. टेबल पुसण्यापासून सुरुवात केली होती, मग मला भाजी चिरण्याचं काम देण्यात आलं. पुढची चार वर्ष मी या भागातल्या अनेक हॉटेलात काम केलं. पर्याय होते म्हणून नोकरी सोडायचो नाही, परिस्थिती भाग पाडायची. एका हॉटेलात तीन महिने काम केल्यानंतर मला काढण्यात आलं. काम करणाऱ्यांना कोणत्याही सोयीसुविधा द्यायला मालक तयार नसे. त्यामुळे ज्याठिकाणी काम संपल्यावर झोपायला थोडी जागा मिळेल ते काम मी घेत असे. पण काहीवेळेला काम मिळत नसे. दिवसभर काम शोधायचं, रात्री स्टेशनवर जाऊन झोपायचं’.

आणखी वाचा: विशेष लेख : कसाब म्हणाला, ‘कैसी हो मॅडम?’

‘हळूहळू कामातले बारकावे समजले. मालकांशी पगाराबद्दल कसं बोलायचं ते कळलं. यातूनच आता जे काम मिळालं होतं ते मिळालं. तिथे मी दहा वर्ष होतो. गावी घरच्यांनी माझं लग्न नातातल्या एका मुलीशी ठरवलं. तिचं नाव रेखा. मुंबईत घर नसल्यामुळे रेखा गावी राहायची, मी इथे मुंबईत. मालक सुट्टी द्यायचे तेव्हा ठाणेवाडीला म्हणजे गावी जाणं व्हायचं. पुढच्या दहा वर्षात आम्हाला आधी मुलगा झाला, मग मुलगी झाली. मुलाचं नाव ओंकार तर मुलीचं ज्योती. ज्या हॉटेलात काम करायचो ते बंद पडलं. मग पुन्हा शोधाशोध सुरू केली. मग स्वस्तिक लंच होम या हॉटेलात काम मिळालं. दक्षिण मुंबईतल्या कष्टकरी वर्गाचं लाडकं हॉटेल. नोव्हेंबर २००८ मध्ये सदाशिव याच हॉटेलात कामाला होते’.

‘तो दिवस आठवला तरी आजही थरकाप उडतो. मी तेव्हा साक्षात मृत्यू पाहिला. माझी मुलं तेव्हा खूपच लहान होती. कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरच होती. त्यांनी काय केलं असतं हा विचार डोक्यात आला तरी डोकं गरगरतं’, असं सदाशिव सांगतात. उपचारानंतर सदाशिव गावी परतले पण त्यांचं नशीब बदललं नाही. घरच्यांना वाटायचं की त्यांनी गावातच राहून काही काम शोधावं. पण सदाशिव पुन्हा मुंबईला आले.

‘मुंबईत पुन्हा नव्याने काम शोधणं सोपं नव्हतं. जे पैसे मदत म्हणून मिळाले ते कर्ज आणि देणी चुकवण्यात गेले. ज्या हॉटेलात ते काम करायचे तिथे नव्या माणसाला घेतलं होतं. मग सदाशिव यांनी चहाच्या टपऱ्या आणि छोट्या खाण्यापिण्याच्या दुकानांवर काम करायला सुरुवात केली. २००९ मध्ये त्यांनी स्वत:चाच वडापावचा स्टॉल टाकला. थोड्या दिवसांनी त्यांनी ऑम्लेट, भुर्जी आणि उकडलेली अंडी विकायलाही सुरुवात केली’.

सदाशिव यांचा दिवस आता सकाळी सहा वाजता सुरु होतो. टपरी उघडून साफसफाई करतात. तोवर पाव आणि अंडी येतात. जवळच्या भाजी मार्केटमध्ये जाऊन टोमॅटो, कांदे, मिरच्या आणि मसाले आणतात. ७ वाजता स्टॉल सुरू करतात. त्यानंतर दिवसभर त्यांना उसंतच मिळत नाही. सदाशिव स्वत: भाज्या चिरतात. ऑम्लेट तयार करतात आणि पैशाचंही बघतात. स्टीलच्या छोट्या डब्यात पैसे ठेवतात. एखाद्या गरजूकडे पैसे नसतील तर अडवत नाहीत. ‘इथे येणारे अनेकजण माझ्यासारखे गावाकडून आलेली माणसं आहेत. काही आजूबाजूच्या झोपडपट्टीतून येतात. मी अनेकरात्री उपाशी राहून काढल्या आहेत. पैसे नसले की काय वेळ येते हे मी अनुभवलं आहे. त्यामुळे मी पैशासाठी भुकेल्याला अडून राहत नाही. ती माणसं नंतर पैसे देतात’, असं सदाशिव आवर्जून सांगतात.

सदाशिव यांचे अनेक ग्राहक नियमित कार्यालयात काम करणारी माणसंही आहेत. आजूबाजूच्या उंच इमारतींमध्ये ती काम करतात. मला आता ते ओळखतात. अनेकांना माझ्या आयुष्यात काय घडलं आहे हे ठाऊकही नाही. काही वर्षांपूर्वी वर्तमानपत्रात त्यांनी माझ्याबद्दल वाचलं तेव्हा मला विचारलं. काही क्षणांसाठी आजूबाजूच्या गर्दीपेक्षा मी वेगळा ठरलो होतो. त्या भागातला एका कुत्रा सदाशिव यांचा मित्र झाला आहे. तो दिवसभर त्यांची साथ देतो. पावसाळ्यात सदाशिव झोपण्यासाठी एखादा ट्रक बघतात.

पण हे जगणं महापालिकेच्या दृष्टीने बेकायदेशीर आहे. सदाशिव यांच्याप्रमाणे हजारो मंडळी आहेत. सदाशिव यांच्याकडे लायसन्स नाही. त्यामुळे त्यांच्यावर पालिका आणि पोलीस कारवाई करते. राज्य सरकारने एकूण लोकसंख्येच्या २.५ टक्के इतक्याच लोकांना लायसन्स देण्याचं ठरवलं आहे, नवीन लायसन्स देण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. अतिक्रममण विभागाची माणसं आली की काय करायचं याचीही त्यांना आता सवय झाली आहे. अनेकदा कठोर अॅक्शन घेतली जाते. आम्हाला तुरुंगात डांबून ठेवतात. गयावया करावं लागतं. मोठा दंड ठोठावतात. अनेकदा आमचा गाडा कुठे नेलाय तेही समजत नाही. एकदा मला ते मिळवायला मुलुंडला जावं लागलं. अशावेळी नाशिवंत पदार्थ खराब होतात. नुकसान होतं. अतिक्रमण विभागाची गाडी येतेय कळलं तर एखाद्या गिऱ्हाईकासाठी काही तयार करत असेन ते सोडून पळतो.

सदाशिव यांचं आयुष्य जसं बदलत गेलं आहे तसंच मुंबईही बदलली आहे. सदाशिव यांच्या स्टॉलभोवताली गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत. पालिकेची कारवाई आता खूपच सातत्याने होऊ लागली आहे. मोठ्या इमारतीत राहणाऱ्या लोकांना आमच्यासारखे गाडा चालवणारे नको असतात. दोन घटनांमुळे सदाशिव यांना आठवडाभर कामच नव्हतं. पहिली घटना म्हणजे एलफिन्स्टन स्थानकात झालेली चेंगराचेंगरी. कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेली भीषण आग. यात अनेकांनी जीव गमावले, अनेकांची कार्यालयं नष्ट झाली. त्यावेळी छोट्या विक्रेत्यांवर बडगा उगारण्यात आला. धाकदपटशाचा प्रयत्न झाला. काम करण्यापेक्षा गयावया करणं नको होतं. आता माझ्याकडे लायसन्स नाहीये पण आमचा माणुसकीच्या पातळीवर विचार व्हावा. मला असंच कायम जगायचं नाहीये. माझ्या मुलांची शिक्षणं पूर्ण होईपर्यंत हे करायचं आहे. मी दुसरं कुठलं काम आता करु शकत नाही. मी काहीच शिकलो नाहीये. मी शहरातच राहून पडेल ते काम करतो आहे. ऑफिसमधलं काम मला जमू शकेल असं वाटत नाही.

सदाशिव यांच्यासाठी त्यांची मुलं काळजीचं कारण आहेत आणि दुसरीकडे आशेचा किरणही. सदाशिव यांची मिळकत खूप नसली तरी त्यांची दोन्ही मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत आहेत. ओंकार गावापासून ४० किमीवरच्या एका निवासी शाळेत जातो. सदाशिव यांचं मुलांशी फोनवर बोलणं होतं. ‘त्यांना काय नवं शिकवत आहेत हे ऐकतो. अलीकडे ओंकारने हॉकीस्टिक मागितली. आंतरशालेय स्पर्धा होती, त्याला खेळायला आवडतं. मी त्याला मुंबईला यायला सांगितलं. आम्ही एका खेळायचं साहित्य मिळतं त्या दुकानात गेलो. त्याला मला ती द्यायची होती पण पैसा कमावण्यासाठी किती कष्ट उपसावे लागतात हेही त्याला दाखवायचं होतं. त्याला मी माझ्या गाडीपाशी घेऊन गेलो. दिवसभर मी काय काय करतो ते दाखवलं’.

‘माझी बायको आणि मुलगीही इथे येऊन गेले आहेत. मुलगी मुंबईत आली तेव्हा ती बिनधास्त होती. माझ्यासारखी बुजलेली नव्हती. तिने मुंबईविषयी जे जे ऐकलं होतं ते ते तिला पाहायचं होतं. मी काही दिवस सुट्टी घेतली आणि त्यांना मुंबई दर्शन घडवलं. गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी सगळं’.

‘रेखा, माझी बायको उत्तम स्वयंपाक करते. तिने इथे यावं आणि माझ्याबरोबर काम करावं असं वाटतं. मांसाहारी पदार्थ ही तिची खासियत आहे. ओंकारला लष्करात जायचं आहे तर ज्योतीला पोलिसांमध्ये. माझ्या सगळ्या आशा त्या दोघांवर आहेत. दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी मनातून जात नाहीत. त्यादिवशी मी जवळपास मेलोच होतो. माझा पुनर्जन्मच झाला. माझ्या मुलांना तरी चांगलं आयुष्य मिळावं एवढीच इच्छा आहे’, असं सदाशिव सांगतात.

Story img Loader