पुणे : काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेशनतर्फे (सीआयएससीई) घेण्यात आलेल्या दहावी (आयसीएसई) आणि बारावी (आयएससी) परीक्षांचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. त्यात मुंबई-ठाण्यातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेत ९९.८ टक्के गुणांसह पहिला क्रमांक मिळवणाऱ्या देशातील नऊ विद्यार्थ्यांपैकी पाच राज्यातील आहेत. त्यात मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधील श्रेया उपाध्याय, कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूलमधील तनय शाह, चॅम्पियन स्कूलमधील अद्वय सरदेसाई, मालाडच्या चिल्ड्रेन्स अ‍ॅकॅडमीतील हिया संघवी, ठाण्याच्या सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलमधील यश भसीन यांचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बारावीच्या परीक्षेत ९९.७५ टक्के गुणांसह देशात पहिला क्रमांक मिळवणाऱ्या पाच विद्यार्थ्यांत ठाण्याच्या सिंघानिया स्कूलच्या इप्शिता भट्टाचार्यचा समावेश आहे. दहावीचा निकाल ९८.९४ टक्के, तर बारावीचा निकाल ९६.९३ टक्के लागला. महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पश्चिम विभागाचा दहावीचा निकाल ९९.८१ टक्के, बारावीचा निकाल ९८.३४ टक्के लागला. विभागनिहाय निकालामध्ये दहावीच्या निकालात पश्चिम विभागाने ९९.८१ टक्क्यांसह देशात अग्रस्थान मिळवले. तर बारावीच्या निकालात ९९.२० टक्क्यांसह दक्षिण विभागाने बाजी मारल्याचे नमूद करण्यात आले आहे.

यंदा दोन लाख ३७ हजार ६३१ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी दोन लाख ३५ हजार ११४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात एक लाख २६ हजार ४७४ मुले, एक लाख आठ हजार ६४० मुली आहेत. बारावीची परीक्षा ९८ हजार ५०५ विद्यार्थ्यांनी दिली. त्यांतील ९५ हजार ४८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात ४९ हजार ६८७ मुले आणि ४५ हजार ७९६ मुली आहेत. दोन्ही परीक्षांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. दहावीचा निकाल मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अध्र्या टक्क्याने, तर बारावीच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण २.१४ टक्क्यांनी जास्त आहे.

पुनर्मूल्यांकन सुविधा

गुणांच्या पुनर्मूल्यांकनाची सुविधा सुविधा २१ मेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. अधिक माहिती  http://www.cisce.org या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

यशने परिक्षेपूर्वी दोन महिने झपाटून अभ्यास केला. श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेतील सर्व शिक्षकांनी त्याला मोलाचे मार्गदर्शन केले होते.

– मनिष भसीन, यशचे वडील

इप्सिताने अभ्यास करावा म्हणून आम्ही तिच्यावर दबाव आणला नाही. ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होईल, असा विश्वास होता. मात्र देशात प्रथम येण्याचा मान मिळवण्यात तिच्या शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे.

– इप्सिता भट्टाचार्यचे पालक

मला फक्त चांगल्या गुणांची अपेक्षा होती. पण देशात पहिला क्रमांक मिळाल्यामुळे आनंदाश्रू आले. मला संगणकामध्ये रस आहे. त्यामुळे अभियांत्रिकीमध्ये उच्च शिक्षण घेणार आहे.

– श्रेया उपाध्याय, बॉम्बे स्कॉटिश, माहीम

निकालात घट

गेल्या वर्षी दहावीचा निकाल ९९.९७ टक्के, तर बारावीचा ९९.३८ टक्के लागला होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल १.०३ टक्क्यांनी, तर बारावीचा निकाल २.४५ टक्क्यांनी घटला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai thane battle in cisc result three girls first rankers ysh