मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देताच मुंबई-ठाण्यातील समस्त गोविंदा पथकांनी एकच जल्लोष करीत दहीहंडीच्या उत्सवाच्या तयारीला दुप्पट उत्साहाने सुरुवात केली.
सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला असला तरी बाल हक्क संरक्षण आयोगाच्या आदेशामुळे १२ वर्षांखालील मुलांना दहीहंडी उत्सवात सहभागी होता येणार नाही. त्यामुळे आमचा एक थर निश्चितच कमी लागेल. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखून सर्व गोविंदा पथकांनी बाल गोविंदांना थरांपासून दूर ठेवावे. हा निर्णय मनाविरुद्ध असला तरी त्याचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांनी केले.
यंदा बाल गोविंदा नसल्यामुळे चार ‘एक्के’ लावून थरांची उंची वाढविण्याचा प्रयत्न पथकांकडून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपघात होऊ शकतात. परिणामी गोविंदा पथकांनी हा अट्टाहास करू नये, अन्यथा भविष्यात जाचक र्निबधांना सामोरे जावे लागेल, असा इशारा देत पडेलकर म्हणाले, प्रत्येक गोविंदा पथकांनी हेल्मेट, जॅकेटचा वापर करावा.
दहीहंडी उत्सवानंतर नियमावली ठरविण्यात येणार असून भविष्यात प्रत्येक गोविंदा पथकांना त्याचे पालन करावेच लागेल. त्यामुळे यंदा संयमाने उत्सव साजरा करा, असे ते म्हणाले.
आयोजकांच्या हंडय़ांनी विक्रमी उंची गाठली
मुंबई उच्च न्यायालयाने र्निबध घालताच काही आयोजकांनी उत्सवाच्या आयोजनातून काढता पाय घेतला होता. तर काहींनी आपल्या दहीहंडय़ा २० फुटावर आणून उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देताच आयोजकांच्या दहीहंडय़ांनी पुन्हा विक्रीमी उंची गाठली आहे. मोठय़ा बक्षिसांची खैरात करीत अनेकांनी नऊ-दहा थरांच्या दहीहंडय़ा बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यासाठी आयोजकांनी कार्यकर्त्यांना पिटाळले आहे.
गाद्या, सुरक्षा पट्टा आदींची व्यवस्था करण्यात आयोजक गुंतले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा