मुंबई : मुंबईसह राज्यातील गोविंदा पथके मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाली आहेत. ‘ढाक्कुमाक्कुम ढाक्कुमाक्कुम’, ‘गोविंदा रे… गोपाळा’, ‘बोल बजरंग बली की जय’ अशा घोषणा देत मानवी मनोऱ्यांचा रोमहर्षक थरार मंगळवार, २७ ऑगस्ट रोजी अनुभवायला मिळणार आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्सवप्रेमींना आकर्षित करण्यासाठी आणि संबंधित मतदारसंघावर वर्चस्व प्रस्तापित करण्यासाठी राजकीय पक्षांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून लाखो रुपयांच्या बक्षिसांची खैरात केली आहे.
मुंबई शहर, उपनगर, ठाणे व आसपासच्या परिसरातील दहीहंडी उत्सवामध्ये गोविंदा पथकांना लाखोंचे लोणी चाखायला मिळणार असून कोट्यवधींची उलाढाल होणार आहे. तसेच परंपरा व संस्कृती जपण्याच्या उद्देशाने काही गोविंदा पथकांकडून मानवी मनोरा रचनेत देखाव्याचे सादरीकरण करण्यासह सामाजिक संदेश देण्यात येणार आहे. तर महिला गोविंदा पथकांना विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईसह ठाण्यात मोठ्या स्तरावर दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. विविध ठिकाणी आयोजकांनी लाखो रुपयांच्या बक्षिसांसह बॅन्जो आणि डीजेचीही व्यवस्था केली आहे. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांसह कलाकारांचीही मांदियाळी अवतरणार आहे.
हेही वाचा – सहार येथे आठ मीटर खोल खड्डा ; ‘मेट्रो’ भुयारीकरण कामात विध्न
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांना त्यांच्याच मतदारसंघात आव्हान देण्यासाठी यंदाही भाजपतर्फे वरळीतील जांबोरी मैदानात सकाळी १० ते रात्री १० या वेळेत परिवर्तन दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ३ लाख ३३ हजार ३३३ रुपयांची मानाची दहीहंडी बांधण्यात येणार आहे. तर पाच थरांसाठी ५ हजार, सहा थरांसाठी ७ हजार, ७ थरांसाठी ११ हजार आणि ८ थरांसाठी ५१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. भाजपच्या संतोष पांडे यांनी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाचे आयोजन केले आहे. तर ठाकरे गटाच्या युवा सेनेचे वरळीतील विभाग अधिकारी संकेत सावंत आणि आकर्षिका पाटील यांनी वरळीतील श्रीराम मिल चौकात दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून आकर्षक चषकासह एकूण ३ लाख ३३ हजार ३३३ रुपयांची बक्षीसे देण्यात येणार आहे. तसेच याठिकाणी बॅन्जो आणि डीजेसह सांस्कृतिक कार्यक्रमांचेही सादरीकरण होणार आहे. तर ठाकरे गटाच्या युवा सेनेने दुपारी १२ ते रात्री ८ या वेळेत शिवसेना भवनसमोरील राम गणेश गडकरी चौकात निष्ठा दहीहंडी आयोजित केली आहे.
कुलाब्यात महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष व भाजपचे आमदार ॲड. राहुल नार्वेकर यांनी पारंपरिक दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. या दहीहंडी उत्सवात एकूण ११ लाख ११ हजार १११ रुपयांची पारितोषिके आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहे. तर पाच थरांसाठी २ हजार, सहा थरांसाठी ५ हजार, सात थरांसाठी ७ हजार, आठ थरांसाठी २५ हजार आणि नऊ थर रचणाऱ्या गोविंदा पथकास १ लाख १ रुपये देण्यात येणार आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दक्षिण मुंबई विभाग क्रमांक १२ चे विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी माजी विभागप्रमुख दिवंगत पांडुरंग सकपाळ यांच्या स्मरणार्थ ‘दहीहंडी निष्ठावंतांची २०२४’ उत्सवाचे आयोजन केले आहे. या दहीहंडी उत्सवात एकूण ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची पारितोषिके देण्यात येणार असून शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेच्या गिरगाव शाखेजवळ सकाळी १० ते रात्री १० या वेळेत हा दहीहंडी उत्सव होणार आहे.
शिवडी विधानसभेतर्फे मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली काळाचौकीमधील अभ्युद्यनगर येथील शहीद भगतसिंग मैदानात सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मानवी मनोऱ्यांचा रोमहर्षक थरार अनुभवण्यासह या ठिकाणी सांगीतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. विविध गोविंदा पथकांना बक्षीस म्हणून एकूण १२ लाख रुपये देण्यात येणार आहेत. मनसेतर्फे बाळा नांदगावकर यांना शिवडी विधानसभेची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर हा दहीहंडी महोत्सव मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.
प्रथम ९ थर रचणाऱ्या गोविंदा पथकास ११ लाख रुपये
शिवसेना शिंदे गटाकडून ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ४४ च्या पटांगणात सकाळी १० ते रात्री १० या वेळेत ‘संस्कृतीची दहीहंडी – विश्वविक्रमी दहीहंडी २०२४’ या दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडी महोत्सवात प्रथम येऊन नऊ थर रचणाऱ्या गोविंदा पथकास ११ लाख रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तर त्यानंतर येऊन नऊ थर रचणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकास ५ लाख रुपये देण्यात येणार आहे. तसेच पाच थरांसाठी ५ हजार, सहा थरांसाठी १० हजार, सात थरांसाठी १५ हजार, आठ थरांसाठी २५ हजार आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहे.
रुग्णांच्या मदतीसाठी अडीच लाख रुपये
समाजसेवक भिमराव धुळप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपविभागप्रमुख यशवंत विचले यांनी मुंबईतील दादरमधील केशवराव दाते मैदानात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. या दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांची संख्या ही १०० वरून २५ करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. तर उर्वरित ७५ गोविंदा पथकांना बक्षीस म्हणून देण्यात येणारी अडीच लाख रुपये इतकी रक्कम गरजू रुग्णांना मदत म्हणून देण्यात येणार आहे. ‘अडीच लाख रुपये ही रक्कम थोडी वाटत असली, तरी एक नवा पायंडा आम्ही पाडत आहोत. जर असा निर्णय सर्वच दहीहंडी उत्सव आयोजकांनी घेतल्यास एक चांगले समाजपयोगी कार्य होईल’, असे भिमराव धुळप यांनी सांगितले.
पर्यावरणपूरक आयडीयलची दहीहंडी
दादरमधील आयडीयलच्या गल्लीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने आयडीयल बुक डेपो, श्री साई दत्त मित्र मंडळ आणि बाबू शेठ पवार व मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणस्नेही दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यंदा श्री साई दत्त मित्र मंडळाचे ५० वे वर्ष आहे. यंदा दहीहंडीसाठी रचलेल्या थरांवर महिला अत्याचाराविरोधातील देखावा सकाळी साडेदहा वाजता सादर होणार आहे. या सादरीकरणातून ‘महिला सुरक्षा आणि सन्मान’ हा विषय मांडण्यात येणार आहे. तसेच पर्यावरणपूरक सण – उत्सव साजरे कसे करावेत, यासंदर्भात पथनाट्याचे सादरीकरणही होणार आहे. दिव्यांग व अंध बंधू – भगिनींच्या गोविंदा पथकाकडूनही थर रचण्यात येणार आहे. तसेच मालाड पूर्वेकडील शिवसागर गोविंदा पथकाकडून महिला अत्याचाराविरोधातील आणि शिवकालीन मावळ्यांच्या इतिहासावरील देखावे दहीहंडीसाठी रचलेल्या थरांवर सादर केले जातील. या दहीहंडी उत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवर व मनोरंजनसृष्टीतील कलाकार हजेरी लावणार आहेत.