मुंबई: मुंबई, ठाणे शहरांत गुरुवारी पहाटेपासून संततधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने गुरुवारी आणि शुक्रवारी ठाणे, पालघर जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर मुंबईत अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.राज्यातील अनेक भागांत सोमवारपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई शहर, उपनगरात, तसेच इतर काही भागांत बुधवारी पावसाने जोर धरला होता.
दरम्यान, मुंबई, ठाणे शहरांत गुरुवारीही पाऊस कोसळत आहे. परिणामी, हवामान विभागाने ठाणे, पालघर जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्याला गुरुवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. मात्र, हवामान विभागाने आता रायगड जिल्ह्याला शुक्रवारीही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये, नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.