मुंबई : ऑगस्ट महिन्यात दडी मारणाऱ्या पावसाने गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागांत जोर धरल्याने करपून चाललेल्या खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अवर्षणामुळे पाणीटंचाईला तोंड देणाऱ्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या जिल्ह्यांतील धरणक्षेत्रांत चांगला पाऊस होत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली तर, नाशिकमधील अनेक धरणे तुडुंब झाल्याने विसर्ग सुरू झाला.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठय़ात गुरुवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे तीन टक्क्यांची वाढ झाली असून तो ९३ टक्क्यांवर पोहोचला आहे. भातसा धरणाची पाणी पातळी शुक्रवारी सकाळी ८ वाजता १४०.२४ मीटरवर पोहोचली होती.
हेही वाचा >>>जयस्वाल यांच्या नियुक्तीविरोधातील याचिका फेटाळली
अन्यत्र हलक्या सरी
विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात हलक्या सरींनी शेतकरी वर्गाला दिलासा दिला आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्याचा वाढलेला वेग, मध्य भारतावर असलेला कमी दाबाचा पट्टा, दक्षिणेकडे सरकलेला मोसमी पावसाचा आस, या पोषक स्थितीमुळे राज्यात पाऊस पडतो आहे. पुढील ४८ तास मोसमी पाऊस सक्रिय राहण्याचा अंदाज आहे. रविवारनंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.