मुंबई: राज्यातील १७ ठिकाणी गोवरचा उद्रेक झाला असून, गोवरला प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभमीवर स्थापन केलेल्या राज्य कृती दलाने दिलेल्या सूचनेनुसार राज्यात उद्रेक झालेल्या सर्व भागात १५ डिसेंबरपासून विशेष लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करण्यात येणार आहे. या टप्प्यामध्ये लसीकरणापासून वंचित बालकांचा शोधू घेऊन त्यांना ‘एम आर १’ या लसीची पहिली मात्रा देण्यात येणार आहे.
राज्यात गोवरला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरणावर भर देण्याच्या सूचना राज्य कृती दलाने दिल्या आहेत. त्यानुसार मुंबईसह राज्यात गोवरचा उद्रेक झालेल्या ठिकाणी लसीकरण मोहिमेला गती देण्यात येणार आहे. उद्रेक असलेल्या भागात लसीकरणापासून वंचित असलेल्या बालकांचे दोन टप्प्यात लसीकरण करण्यात येणार आहे. पहिला टप्पा १५ ते ३१ डिसेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे तर दुसरा टप्पा १५ ते २५ जानेवारीपर्यंत राबवण्यात येणार आहे. लसीकरण वेगाने करण्यासाठी राज्यातील लसीकरणापासून वंचित असलेल्या बालकांचा शोध घेण्यात येत आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात बालकांना ‘एम आर १’ या लसीची मात्रा देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याला १५ डिसेंबरपासून सुरुवात करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> नागपूर-शिर्डी समृध्दी महामार्गावर आजपासून एसटी धावणार
राज्यात या ठिकाणी झाला आहे उद्रेक
मुंबई, मालेगाव मनपा, भिवंडी मनपा, ठाणे जिल्हा, वसई – विरार मनपा, पनवेल मनपा, नवी मुंबई मनपा, औरंगाबाद मनपा, पिपंरी चिंचवड मनपा, बुलढाणा, मिरा भाईंदर, रायगड, जळगाव मनपा, धुळे मनपा, धुळे, उल्हासनगर मनपा
राज्यात उपलब्ध लसींचा साठा
जिल्हास्तर – ११,५५,५७०
विभागीय – १,१९,२५०
राज्यस्तर – ७९,०००
एकूण – १३,५३,८२०