मुंबई : बेस्ट उपक्रमातील भाडेतत्त्वावरील वाहक, चालकांचे विविध आर्थिक मागण्यांसाठी सोमवारी सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. त्याचा थेट फटका बेस्ट प्रवाशांना बसला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून धारावी, प्रतीक्षानगर आगारातून बस चालवण्यात येत नसल्याने प्रवासी खोळंबले आहेत. विविध बस थांब्यावर शेकडो प्रवासी बसची वाट पाहात उभे राहिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या अनेक महिन्यांपासून बेस्ट उपक्रमातील भाडेतत्त्वाच्या बसवरील कर्मचारी आणि संबंधित कंत्राटदार विविध आर्थिक मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. बेस्ट उपक्रमाच्या मातेश्वरी कंपनीच्या भाडेतत्त्वावरील वाहक, चालकांनी बस सोमवारी बंद केल्या आहेत. त्यामुळे धारावी, प्रतीक्षानगर आगारातील बस फेऱ्यांवर परिणाम झाला आहे. प्रतीक्षानगर आगारात ११० बस आणि धारावी आगारात १०० बस उभ्या आहेत. तसेच मजास, मुलुंड, वडाळा, सांताक्रूझ आगारात काहीसा परिणाम झाला आहे. मातेश्वरी कंपनीच्या चालक, वाहकांना वेळेवर वेतन मिळत नाही, त्यांना कायमस्वरुपी कामगार म्हणून सामावून घेण्यात यावे, अशा मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू आहे.

हेही वाचा – अंधेरीतील झोपु योजनेत मृत व्यक्तींच्या नावे पात्रता! आणखी सहा झोपडीवासीयांची पात्रता रद्द

बेस्ट उपक्रमातील मातेश्वरी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे प्रतीक्षा नगरमधील ११० बस बंद आहेत. बेस्टच्या मालकीच्या फक्त ३५ बस या आगारातून बाहेर पडल्या आहेत.

हेही वाचा – सीईटी नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘तिकीट सुविधा’

मातेश्वरी कंपनीच्या कर्मचाऱ्यांमुळे लाखो प्रवाशांना वेठीस धरण्यात येत आहे. बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांनी सुट्टी, रजा न घेता, जादा वेळ काम करावे. जेणेकरून प्रवाशांचा प्रवास योग्यरित्या होईल. तसेच प्रशासनाने स्वमालकीच्या ४ हजार बसचा ताफा लवकरात लवकर घ्यावा. – सुहास सामंत, अध्यक्ष, बेस्ट कामगार सेना

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai the journey of the best bus was stopped the passengers were standing at the bus stop mumbai print news ssb