मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क मैदानावरील धुळीचा प्रश्न सुटण्याचे काही चिन्ह दिसत नसून मुंबई आयआयटीच्या सूचनेनुसार मैदानावर गवत पेरणी करण्यास अद्याप सुरूवात झालेली नाही. तर मैदानावर गवत पेरणी करण्यापेक्षा माती काढण्याचीच गरज असल्याचे येथील काही रहिवाशांचे म्हणणे आहे. या प्रश्नावर काहीच तोडगा निघत नसल्यामुळे शिवाजी पार्क रहिवासी संघटनेने आता न्यायालयीन लढाई लढण्याचे ठरवले आहे. त्याकरीता उच्च न्यायालय किंवा हरित लवादाकडे दाद मागण्याचा रहिवासी संघटनेचा विचार आहे.
दादर पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील लाल मातीच्या धुळीचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षात सुटलेला नाही. दरवर्षी हिवाळा आला की या मैदानातील माती हवेत उडू लागते व त्याचा येथील रहिवाशांना त्रास होतो. उन्हाळ्यात हा त्रास खूप वाढतो. मैदानातील माती काढण्याची रहिवाशांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या प्रश्नावर उत्तर शोधण्यसाठी मुंबई महापालिकेने मुंबई आयआयटीची मदत घेण्याचे ठरवले होते. त्यानुसार आयआयटीने या मैदानाची पाहणी करून जानेवारी महिन्यात आपला अहवाल सादर केला होता. यात आयआयटीने माती न काढण्याची शिफारस केली होती. तसेच धूळ उडू नये म्हणून मातीवर रोलर फिरवणे, पाणी फवारणे या उपाययोजना करण्यास सांगितल्या. त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी मैदानावर क्रिकेट खेळपट्ट्यांचे क्षेत्र वगळून संपूर्ण मैदानात गवताची लागवड करावी, असे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई महापालिकेला दिले आहेत.
दरम्यान, मैदानावर पाणी मारण्याचे निर्देश दिलेले असले तरी मुंबई महापालिकेची यंत्रणा इथे केवळ पाणी मारण्याचे नाटक करीत असल्याची टीका शिवाजी पार्क रहिवासी संघटनेच्या सदस्यांनी व मैदानात येणाऱ्या रहिवाशांनी केली आहे. रोज पाणी मारले जात नाही तर ते कधीतरी मारले जाते. पाणी मारले तरी एवढ्या उन्हात ते तासाभरात वाळते. त्यामुळे त्याचा काहीही उपयोग होत नाही, अशीही प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. तर मैदानात माती टाकताना मुंबई आयआयटीला विचारले होते का ? मग आता मुंबई आयआयटीचा सल्ला कशाला, असाही सवाल येथील रहिवासी करीत आहेत. २०२१ मध्ये गवत पेरणीचा प्रयोग फसलेला असताना पुन्हा तोच प्रयोग करण्याचा वेळकाढूपणा कशासाठी, असेही त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, एमपीसीबीने गवत लागवड करण्यास सांगितले असले तरी १ मार्चपर्यंत मैदानाच्या वेगवेगळ्या भागात थोड्या थोड्या जागेत वेगवेगळे गवत लावून कोणते यशस्वी ठरते ते पाहून त्यानुसार निर्णय घेण्यासही सांगितले होते. त्याचा पालिकेला विसर पडल्याची टीका रहिवासी संघटनेचे प्रकाश बेलवाडे यांनी केली. पालिका प्रशासन फक्त वेळकाढूपणा करीत असल्याची टीका त्यांनी केली. त्यामुळे या प्रश्नी आता न्यायालयीन लढाई लढण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले असून यासाठी उच्च न्यायालयाकडे किंवा हरित लवादाकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालिकेच्या पर्यावरण विभागाकडे आम्ही निधी मागितला आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेऊन गवत पेरणीचे काम केले जाणार आहे. तोपर्यंत सध्या दररोज संध्याकाळी मैदानात पाणी फवारणी केली जात आहे.
अजितकुमार आंबी, सहाय्यक आयुक्त, जी उत्तर