गोरेगाव (पूर्व) येथील उघड्या नाल्यात दोन दिवसांपासून अडकलेल्या ऑटिझमग्रस्त १९ वर्षीय तरुणाची शुक्रवारी वनराई पोलीस आणि स्थानिक पालिका कर्मचाऱ्यांनी सुटका केली. मुलगा बेपत्ता झाल्याबाबतची तक्रार त्याच्या कुटुंबियांनी वनराई पोलिसांकडे केली होती. अखेर सीसीटीव्ही चित्रिकरणाच्या मदतीने पोलिसांनी त्याचा शोध घेऊन महापालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने नाल्यातून त्याला बाहेर काढले. हा नाला उघडा असून २० फुट खोल आहे.
हेही वाचा – उदय उमेश लळीत सरन्यायाधीश पदी ; सोलापूरकरांसाठी आनंदाचा दिवस
हा तरूण वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्गात शिकत असून गोरेगाव येथील बिंबिसार नगर येथील रहिवासी आहे. मुलगा ऑटिझमग्रस्त असल्यामुळे त्याला कुटुंबिय बाहेर सोडत नाहीत. तो बाहेर गेला, तरी जवळच काही ठिकाणी जातो. मात्र, २३ ऑगस्टपासून तो बेपत्ता होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
ऑनलाइन अभ्यास वर्गात २३ ऑगस्टला दुपारी १२ वाजेपर्यंत तो बसला होता. त्यानंतर मोबाइल घरीच ठेवून तो बाहेर पडला. काही काळानंतर तो घरात नसल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. परिसरातील ओबेरॉय मॉल व मोबाईलच्या दुकानात मोबाईल बघण्यासाठी जायचा. तेथेही त्याचा शोध घेण्यात आला. परिसरात कुठेच न सापडल्यामुळे अखेर कुटुंबियांना पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार वनराई पोलिसानी हा तरूण बेपत्ता असल्याची नोंद केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तो राहत असलेल्या परिसरातील सीसीटीव्हीचे चित्रिकरण तपासले. त्यानुसार पश्चिम द्रुतगती मार्गावरून तो जाताना दिसला. आरे सिग्नलपर्यंत सीसीटीव्ही चित्रिकरणात तो दिसत होता. जवळचा पेट्रोल पंप ओलांडल्यानंतर आम्हाला तो सीसीटीच्या चित्रिकरणात दिसला नाही. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश नंदिमठ यांनी दिली.
अखेर पोलिसांनी त्याला नाला परिसरात शोधण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह नाल्यात त्याचा शोध घेण्यात आला. त्यावेळी १० मिनिटे शोधल्यानंतर तो मुलगा नाल्यात बेशुद्धावस्थेत पडलेला आढळला. अखेर त्याला तेथून काढण्यात आले. मुलाच्या अंगाला कचरा लागल्यामुळे दूरून दिसत नव्हता. मुलाच्या प्रकृतीचा कोणताही धोका नसून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे नंदीमठ यांनी सांगितले.