मुंबई : मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत मार्च व एप्रिल २०२४ मध्ये घेतलेल्या उन्हाळी सत्रातील विविध २२ पदवी परीक्षांचे निकाल निर्धारित वेळेत म्हणजेच ३० दिवसांच्या आत जाहीर केले आहेत. उन्हाळी सत्रातील पदवीच्या अंतिम सत्राच्या बी.कॉम., बी.ए., बी.एस्सी., बीएमएस, बी.ए. एमएमसी, बी.एस्सी. आयटी, बी.आर्किटेक्चर या महत्त्वाच्या परीक्षांसह एकूण २२ परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले असून १ लाख २५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
विद्यार्थ्यांना सदर निकाल विद्यापीठाच्या http://www.mumresults.in/ या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल. मुंबई विद्यापीठातून दरवर्षी १० हजारांहून अधिक विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षणासाठी जात असतात, या विद्यार्थ्यांना जून महिन्यात निकालाची आवश्यकता असते. पदवीच्या अंतिम सत्र परीक्षांचे निकाल लवकर जाहीर झाल्यामुळे भारतासह परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या आणि नोकरीची संधी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा – पावसाळ्यात मध्य रेल्वेची नेरळ-अमन लॉज सेवा बंद, माथेरान – अमन लॉज शटल सेवा चालवणार
हेही वाचा – गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाआड येणारी बांधकामे हटवली, प्रकल्पाच्या कामाला वेग
मुंबई विद्यापीठाने मूल्यांकनावर विशेष लक्ष देण्यासाठी विविध विद्याशाखेच्या अधिष्ठात्यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्ती केली होती. तसेच सर्व अभ्यास मंडळांच्या संचालक व सदस्यांनी आपल्या विद्याशाखेच्या शिक्षकांचे विशेष पथक नियुक्त करून निर्धारित वेळेत महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून मूल्यांकन करून घेतले. मुंबई विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी,अधिष्ठाते, महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, तांत्रिक अधिकारी यांच्या सामूहिक प्रयत्नामुळे यावर्षी उन्हाळी सत्राच्या पदवी परीक्षांचे निकाल निर्धारित वेळेत जाहीर करणे शक्य झाले, अशी माहिती मुंबई विद्यापीठ प्रशासनाने दिली.