मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची दुसरी गुणवत्ता यादी शुक्रवार, २१ जून रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांच्या संकेतस्थळावरून दुसरी गुणवत्ता यादी पाहता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदा पहिल्या गुणवत्ता यादीनुसार स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये (कट ऑफ) वाढ आणि पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये किंचितशी घट झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे दुसऱ्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश पात्रता गुणांमध्ये कितपत फरक पडतो, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – शिवसेनेतील फुटीला दोन वर्षे पूर्ण; निवडणुकीत ठाकरे गट वरचढ

हेही वाचा – Video: ‘राहोवन’ वादानंतर IIT मुंबईची विद्यार्थ्यांवर कारवाई; सव्वा लाखांचा दंड, हॉस्टेलमधून निलंबन, संस्था संचालक म्हणतात…

मुंबई विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दुसऱ्या गुणवत्ता यादीअंतर्गत संबंधित महाविद्यालयात जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी आणि शुल्क भरून प्रवेश निश्चिती (हमीपत्र अर्जासह) २२ ते २७ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत होणार आहे. तसेच २८ जून रोजी सायंकाळी ५ वाजता तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होईल आणि या यादीअंतर्गत संबंधित महाविद्यालयात जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी आणि शुल्क भरून प्रवेश निश्चिती (हमीपत्र अर्जासह) २९ जून ते ३ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत होईल. तिसऱ्या गुणवत्ता यादीअंतर्गतची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांचे ओरीएंटेशन व तासिका या ४ जुलैपासून सुरू होणार आहेत, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच, मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी ही एकूण २ लाख ५० हजार ४५३ विद्यार्थ्यांनी केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी ८ लाख ७० हजार ५९५ एवढे अर्ज सादर केले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai the second merit list for degree admission will be announced this evening mumbai print news ssb
Show comments