मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील परीक्षा भवनाच्या नवीन इमारतीत (छत्रपती शिवाजी महाराज भवन) छायांकित प्रत केंद्र (झेरॉक्स सेंटर) नसल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांना तत्काळ कागदपत्रांची छायांकित प्रत हवी असल्यास परीक्षा भवनापासून दूरवर असलेल्या छायांकित प्रत केंद्रांजवळ रिक्षाने जावे लागत आहे.

कलिना संकुल तब्बल २४३ एकर जागेवर उभे आहे. या संकुलात ५० हून अधिक विविध शैक्षणिक विभाग आहेत. परंतु एवढ्या मोठ्या संकुलात आरोग्य केंद्र, दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्र (पूर्वीचे आयडॉल), जवाहरलाल नेहरू ज्ञान स्त्रोत केंद्र म्हणजेच ग्रंथालय या तीनच ठिकाणी छायांकित प्रत केंद्रे आहेत. ही तीनही छायांकित प्रत केंद्रे जवळपासच आहेत. परंतु विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या कलिना संकुलातील परीक्षा भवनाच्या नव्या इमारतीत छायांकित प्रत केंद्र नाही.

हेही वाचा – मुंबई : वृद्धाचे सोने लुटणाऱ्या दोघांना अटक

परीक्षाविषयक विविध कामांसाठी मुंबईसह ठाणे, कल्याण – डोंबिवली, नवी मुंबई, तसेच कोकणासारख्या ग्रामीण भागातूनही बहुसंख्य विद्यार्थी परीक्षा भवनात येत असतात. विद्यार्थ्यांना तत्काळ कागदपत्रांची छायांकित प्रत हवी असल्यास संकुलातील व संकुलाबाहेरील छायांकित प्रत केंद्रांमध्ये रिक्षानेच जावे लागते. १ रुपयाच्या छायांकित प्रतीसाठी विद्यार्थ्यांना येऊन – जाऊन रिक्षाचे ४६ रुपये भाडे मोजावे लागत आहे. तसेच विद्यार्थ्यांना संकुलातील छायांकित प्रत केंद्राची माहिती नसल्यामुळे त्यांचा गोंधळ उडतो.

हेही वाचा – वडाळ्यातील किराणा दुकानाला भीषण आग, स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात वृद्धाचा मृत्यू

विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा भवनात छायांकित प्रत केंद्र सुरू करावे. तसेच कागदपत्रांच्या छायांकित प्रतींची आवश्यकता भासणार नाही, अशी ऑनलाइन प्रणाली विकसित करावी. – संजय वैराळ, माजी अधिसभा सदस्य

Story img Loader