मुंबई : चोरीच्या गुन्ह्यांतील २७ वर्षीय आरोपीने पोलीस ठाण्यातील शौचालयाच्या खिडकीची जाळी तोडून पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीला चोरीच्या दागिन्यांसह रंगेहाथ पकडण्यात आले होते. याप्रकरणी आरोपी पोलीस कोठडीत होता. आरोपीने पलान केल्यामुळे आता त्याच्याविरोधात आणखी एक गुन्हा वाकोला पोलिसांनी दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सांताक्रुझ पूर्व येथील वाकोला परिसरातील रहिवासी, तक्रारदार पॅरेलाल राजभर गावी जाणारी पत्नी व मुलाला सोडण्यासाठी मंगळवारी रेल्वे स्थानकावर गेले होते. दोघांना रेल्वेत बसवून राजभर व त्यांची मुलगी घरी परतले असता घराच्या दरवाजाचे कुलूप कोणी तरी काढल्याचे दिसले. दरवाजा आत ढकलला असता तो आतून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दरवाजा ठोकला. त्यावेळी आतून अचानक एका व्यक्तीने दरवाजा उघडला व लोखंडी सळीने राजभर यांच्यावर हल्ला केला. त्यात ते जखमी झाले. त्यांनी आरडाओरडा केला असता शेजारी मदतीला धावले. शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी आरोपीला पकडण्यात यश आले. आरोपीकडे घरातील दागिने सापडले.
हेही वाचा – एअरपोर्ट फनेलवासीयांच्या पुनर्विकासासाठी अखेर टीडीआर!
याप्रकरणी राजभर यांनी वाकोला पोलिसांकडे तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचे नाव महेश गुरव (२७) असून त्याला अटक करण्यात आली होती. आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस ठाण्यातील अंमलदार कक्षाच्या शेजारी असलेल्या शौचालयात आरोपी गेला होता. त्यावेळी त्याने तेथील खिडकीवरील लोखंडी जाळी तोडली आणि पलायन केले. याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यातील हवालदार सुनील म्हस्के यांच्या तक्रारीवरून आरोपी महेशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शीव कोळीवाडा येथील ट्रान्झीट कॅम्पमधील रहिवासी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.