मुंबई: दसऱ्यानिमित्त स्कूलबसचे चालक पूजा करण्यात व्यस्त असताना एका चोरट्याने बस पळवल्याची घटना शनिवारी घाटकोपर परिसरात घडली. मात्र मालकाने पाठलाग करून बस चालकाला पकडून पंतनगर पोलिसांच्या स्वाधीन केले असून त्याच्या ताब्यातून चोरलेली बस हस्तगत करण्यात आली आहे.
घाटकोपरच्या गणेश ट्रान्सपोर्टची ही बस असून शनिवारी दसऱ्या निमित्त पूजा करण्यासाठी ती बस घाटकोपर बेस्ट बस समोर उभी केली होती. गणेश ट्रान्सपोर्टच्या याच ठिकाणी अन्य पाच बसही उभ्या होत्या. बसवरील चालकांनी बसची पूजा केल्यानंतर सर्वजण प्रसाद खाण्यात व्यस्त असताना अचानक त्यातील एक बस एका चोरट्याने पळवली. त्यावेळी तेथे गणेश ट्रान्सपोर्टचे मालक आणि पाच ते सहा कर्मचारी उभे होते. त्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ बसचा पाठलाग केला. वडाळा परिसरात बससमोर मोटारगाडी उभी करून बस थांबवली.
हेही वाचा – मुंबईत पुढील तीन ते चार तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
त्यावेळी चोरट्याने भीतीपोटी बस रस्त्यातच सोडून वडाळा परिसरातील एका नाल्यात उडी घेतली. मात्र त्याला नाल्यातून बाहेर निघता येत नसल्याने अखेर स्थानिकांनी त्याबाबत वडाळा पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानुसार अग्निशमन दलाच्या जवानांनी आरोपीला बाहेर काढून त्याला वडाळा पोलिसांच्या स्वाधीन केले. बिट्टू दास असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पंतनगर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे.