मुंबई : गेल्या आठवडाअखेरीस नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्पोर्ट्स स्टेडियममध्ये ‘कोल्ड प्ले’ कार्यक्रम पार पडला. आता २५, २६ जानेवारी रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने मुंबई – अहमदाबाददरम्यान चार विशेष वातानुकूलित रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या मागणीनुसार मुंबई – अहमदाबाद दरम्यान चार विशेष वातानुकूलित रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवांचा लाभ ‘कोल्ड प्ले’ च्या संगीत कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या चाहत्यांना होईल.
लोकमान्य टिळक टर्मिनस – अहमदाबाद – लोकमान्य टिळक टर्मिनस वातानुकूलित विशेष दोन फेऱ्या धावतील. गाडी क्रमांक ०११५५ वातानुकूलित विशेष २५ जानेवारी रोजी रात्री १२.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी ११ वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०११५६ वातानुकूलित विशेष २६ जानेवारी रोजी रात्री २ वाजता अहमदाबाद येथून सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी ११.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, भिवंडी रोड, कामण रोड, वसई रोड, वापी, उधना, सुरत आणि वडोदरा येथे थांबा असेल. या रेल्वेगाडीला दोन प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, ४ द्वितीय वातानुकूलित, १४ तृतीय वातानुकूलित आणि १ जनरेटर कार डबे असतील.
हेही वाचा >>>‘महाकुंभ’ मेळ्यातील वाढत्या गर्दीमुळे महाराष्ट्रातील ट्रॅव्हल कंपन्यांकडून नियोजनाऐवजी मार्गदर्शन
दादर – अहमदाबाद – दादर वातानुकूलित विशेष दोन फेऱ्या धावतील. गाडी क्रमांक ०११५७ वातानुकूलित विशेष २६ जानेवारी रोजी रात्री १२.३५ वाजता दादर येथून सुटेल आणि त्याचदिवशी सकाळी ११ वाजता अहमदाबादला पोहोचेल. गाडी क्रमांक ०११५८ वातानुकूलित विशेष २७ जानेवारी रोजी रात्री २.०० वाजता अहमदाबाद येथून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२.५५ वाजता दादर येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, भिवंडी रोड, कामण रोड, वसई रोड, वापी, उधना, सुरत आणि वडोदरा येथे थांबा असेल. या रेल्वेगाडीला दोन प्रथम वातानुकूलित, दोन प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, १ द्वितीय वातानुकूलित, २ द्वितीयसह तृतीय वातानुकूलित, ९ तृतीय वातानुकूलित आणि २ द्वितीय सिटिंग सह गार्ड्स ब्रेक व्हॅन असे डबे असतील. या विशेष रेल्वेगाडीचे आरक्षण २३ जानेवारी रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी या संकेतस्थळावर सुरू होईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.