मुंबई : कझाकस्तानमधील सर्वात मोठे शहर अल्माटी आणि भारताची आर्थिक राजधानी मुंबईदरम्यान आठवड्यातून तीन वेळा विमान सेवा सुरू करण्याची घोषणा एअर अस्तानाने नुकतीच केली. कझाकस्तान आणि भारतादरम्यान सुरू केलेल्या विमान सेवेला २० वर्षे झाली असून त्यानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वरील घोषणा करण्यात आली.

नवीन विमान सेवेच्या लोकार्पणाच्या निमित्ताने मुंबईत गुरुवारी आयोजित स्वागत समारंभात एअर अस्ताना समुहाचे विशेष कार्यकारी अधिकारी पीटर फोस्टर म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. व्यापार, वित्त आणि उद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे महानगर असलेल्या मुंबईसाठी सेवा सुरू करण्यास एअर अस्तानाला आनंद होत आहे. व्यवसाय आणि पर्यटनाच्या निमित्ताने कझाकस्तान आणि भारतातील शहरांना भेट देणाऱ्यांसाठी एअर अस्तानाची विमान सेवा सदैंव तत्पर असतील. सध्या वारंवारतांमध्ये नियमित वाढ होत असताना अल्माटीहून दिल्लीला आठवड्याभरात नऊ उड्डाणे होतात. तसेच भविष्यात भारतातील अन्य शहरे कझाकस्तानमधील अल्माटी शहराला विमान सेवेद्वारे थेट जोडण्याचा विचार आहे. कझाकस्तानमधील अनेक शहरे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी आणि भारतीयांनी मुंबई – अल्माटी थेट विमान सेवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन एअर अस्ताना समुहाकडून करण्यात आले आहे.