मुंबईः टेम्पोवरील कारवाई टाळण्यासाठी परिवहन अधिकाऱ्याचा मोबाइलच पळवल्याचा प्रकार कुर्ला परिसरात घडला. टेम्पोचालक व त्याच्या साथीदाराने परिवहन अधिकाऱ्याला मारहाणही केली. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी दोघांविरोधात मोबाइल चोरी व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तक्रारदार अमोल सकपाळ (३४) सहाय्यक मोटरवाहन निरीक्षक म्हणून ताडदेव येथील परिवहन विभागात कार्यरत आहेत. मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांना वरिष्ठांनी दिले होते. त्यानुसार ते कुर्ला पश्चिम येथील एल.बी.एस. रोडवरील महाराष्ट्र काटा परिसरात वाहनांची तपासणी करीत होते. यावेळी त्याचे सहकारी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सुनील ढगे व चालक सुजीत कदम हेही त्याच्यासोबत तेथे तैनात होते. तक्रारीनुसार, मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास एक टेम्पो तेथून जात होता. त्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजनाचा माल भरण्यात आल्याचा संशय आल्यामुळे त्यांनी चालकाला टेम्पो थांबवण्याचा इशारा केला. पण टेम्पोचालक थांबला नाही. अखेर कदम यांनी टेम्पो चालकाला हरि मशिदीजवळ थांबवले. त्याला टेम्पोचे वजन करण्यासाठी काट्याजवळ जाण्यास सांगितले. पण तो चालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने कदम यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. अखेर सकपाळ तेथे गेले व त्या दोघांनी चालकाला काट्याजवळ आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने शिवीगाळ करून एका व्यक्तीला दूरध्वनी केला. दूरध्वनी केल्यानंतर चालकाचा साथीदार तेथे मोटरसायकलवरून आला. त्याने आपण टेम्पोचा मालक असून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सकपाळ यांनी मोबाइलवरून टेम्पोचे छायाचित्र काढले असता चालकाच्या साथीदाराने मारहाण करून सकपाळ यांचा मोबाइल हिसकावून घेतला. टेम्पोचालकाला परवाना परत केला नाही, तर मोबाइल फोडून टाकेन अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर त्याने फुटलेला मोबाइल स्वतःजवळ ठेवला.

हेही वाचा – मीरा रोड दंगल प्रकरण : १४ मुस्लिम तरुणांना उच्च न्यायालयाकडून जामीन

हेही वाचा – मुंबई : १९ कोटींच्या सोन्या, चांदीसह आरोपीला अटक

सकपाळ यांनी ई चलन यंत्राने टेम्पोचे छायाचित्र घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याने हे यंत्रही हिसकावण्याचा प्रयत्न केला. अखेर तेथे दोन पोलीस आले असता चालक आणि चालकाचा साथीदार मोटरसायकलवरून पळून गेला. त्यांनी परिवहन अधिकाऱ्याचा मोबाइलही सोबत नेला. त्याचवेळी टेम्पो चालकानेही तेथून पळ काढला. पण चालक परवान्यावरून टेम्पो चालकाचे नाव देव कुंचिकोवर असल्याचे समजले. त्याद्वारे दोन्ही आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. दोन्ही आरोपींविरोधात मोबाइल चोरी व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai to avoid action on the vehicle the mobile of the transport officer was stolen mumbai print news ssb