मुंबई : गेल्या काही वर्षांपासून मुंबई महापालिकेला घन कचरा व्यवस्थापनासाठी मोठा निधी खर्च करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन अर्थसंकल्पात घन कचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क आकारण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

घन कचरा व्यवस्थापन आरोग्य आणि स्वच्छता उपविधी २००६ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. मुंबईकरांकडून दरमहा १०० रुपयांपासून ७,५०० रुपये घन कचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क वसूल करण्यात येणार आहे.

विघटन अथवा विल्हेवाट लावता न येणारा कचरा डोकेदुखी बनला असून या कचऱ्यामुळे प्रदुषणात भर पडत आहे. मुंबई महानगरपालिकेने १२ डिसेंबर २००६ रोजी घन कचरा व्यवस्थापन आरोग्य आणि स्वच्छता उपविधी अंमलबजावणी सुरू केली. आता महापालिकेने घन कचरा व्यवस्थापन उपविधीमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

आतापर्यंत महापालिका सोसायट्या, चाळी, बहुमजली इमारती, हॉटेल आदी ठिकाणांहून विनाशुल्क कचरा घेऊन त्याची विल्हेवाट लावत आहे. त्यासाठी मोठा निधी खर्च करावा लागत आहे.

घन कचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्काचे दर निश्चित करण्यात आले असून या संदर्भात नागरिक, संस्था आदींकडून सूचना आणि हरकती मागविण्यात येणार आहेत. तत्पूर्वी यासंदर्भात विधि विभागाचा अभिप्राय मागविण्यात येणार आहे.

शुल्काचे स्वरुप

सदनिकेच्या क्षेत्रानुसार घन कचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

५० चौ.मी. क्षेत्रफळाच्या (बिल्ट अप) सदनिकेसाठी १०० रुपये, ५० ते ३०० चौ.मी. क्षेत्रफळाच्या सदनिकेसाठी ५०० रुपये, ३०० चौ.मी. क्षेत्रफळाहून अधिक मोठ्या सदनिकेसाठी एक हजार रुपये,

व्यावसायिक आस्थापनांसाठी ५०० रुपये, गेस्ट हाऊस २००० हजार रुपये, हॉटेल्स ७५० रुपये, तारांकीत नसलेली हॉटेल्स, रेस्तराँसाठी १५०० रुपये, तीन तारांकीत हॉटेल रेस्तराँसाठी ७,५०० रुपये, व्यावसायिक कार्यालये, सरकारी कार्यालये, बँक, विमा कार्यालय, कोचिंग क्लासेस, शैक्षणिक संस्था यांच्यासाठी ७५० रुपये प्रस्तावित आहेत.

५० खाटांची क्षमता असलेले दवाखाना आणि ५० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या प्रयोगशाळेसाठी २००० रुपये ते २५०० रुपये, ५० पेक्षा जास्त क्षमता असलेल्या प्रयोगशाळा आणि दवाखान्यांसाठी ४००० रुपये ते ५००० रुपये, लघु आणि कुटीर उद्याोगांसाठी १५०० रुपये, गोदाम आणि शीतगृहांसाठी २५०० रुपये, ३००० चौ.मी. क्षेत्रफळ असलेल्या सभागृहासाठी ५००० रुपये, तर ५००० चौ.मी.हून जास्त क्षेत्रफळ असलेल्या विवाह सभागृह, उत्सव, प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येणाऱ्या सभागृहासाठी ७,५०० रुपये प्रतिमहा घन कचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क वसूल करण्यात येणार आहे.

दरम्यान, बंगळुरू, चेंन्नई, नवी दिल्ली, तसेच पुणे येथे घन कचरा व्यवस्थापनविषयक शुल्क आकारण्यात येत आहे.

मंजुरीनंतर अंमलबजावणी

सूचना आणि हरकतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुधारित प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. घन कचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क निश्चित करताना सदनिकेचे बांधकाम क्षेत्र विचारात घेण्यात आले आहे.

Story img Loader