मुंबईत सुमारे सहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे ९० आठवडय़ांत बसविण्यासाठी राज्य सरकारने शनिवारी लार्सन अँड टुब्रो कंपनीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करार केला. गेली पाच वर्षे रखडलेला हा प्रकल्प आम्ही सत्तेवर आल्यावर १०० दिवसांत मार्गी लावला असून आता पुणे, नागपूर अशा मोठय़ा शहरांमध्येही सीसीटीव्ही बसविण्यासाठीही लवकरच पावले टाकली जातील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. हे कॅमेरे लावण्यात आल्यावर मुंबईतील सुरक्षाव्यवस्थेला मजबूत कवच मिळणार असून, अगदी साखळीचोरांपासून गंभीर गुन्ह्य़ांतील गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी मदत होणार आहे. तर अतिरेक्यांच्या किंवा गुन्हेगारांच्या संशयास्पद हालचाली टिपल्या गेल्यास त्या रोखणेही शक्य होणार आहे.

मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यावर बरीच चर्चा झाली, पण ते काम होऊ शकले नव्हते. आता एल अँड टी कंपनीला सुमारे ९४५ कोटी रुपयांचे हे कंत्राट देण्यात आले असून हे काम ९० आठवडय़ांत पूर्ण केले जाणार आहे. कंपनीकडून पाच वर्षे देखभालही केली जाणार आहे, अशी माहिती मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी दिली. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग गुन्ह्य़ांच्या तपासाला मदत करणे, गुन्हेगारी कारवाया रोखणे, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि वाहतूक व्यवस्थापन यासाठी केला जाणार आहे. त्यासाठीचे माहिती केंद्र (डेटा सेंटर) वरळी आणि नवी मुंबईत असेल. पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात मुख्य नियंत्रण कक्ष असेल आणि कालिना येथे दुसरा नियंत्रण कक्ष उभारला जाईल. त्याचबरोबर सर्व पोलीस ठाणी, उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयात या कॅमेरांनी टिपलेले चित्रण पाहता येईल.

अशी असेल सीसीटीव्ही यंत्रणा
आयपी कॅमेरे – १४९२
पीटीझेड कॅमेरे – ११५०
थर्मल कॅमेरे – २०
फिक्स्ड बॉक्स कॅमेरे – ४८५०

सीसीटीव्ही कार्यान्वित होण्याचे टप्पे
दक्षिण मुंबई – नोव्हेंबर २०१५
उत्तर आणि पूर्व मुंबई – एप्रिल २०१६
मध्य आणि पश्चिम विभाग – सप्टेंबर २०१६

Story img Loader