मुंबई : ओडिशामधील बालासोर येथे भीषण रेल्वे दुर्घटना झाल्याने ३ जून रोजी मडगाव – मुंबई वंदे भारतचे उद्घाटन तडकाफडकी रद्द करण्यात आले होते. आता मुंबई – गोवा वंदे भारतची प्रतीक्षा अखेर संपली असून २७ जून रोजी मडगाववरून तिचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
कोकण मार्गावरील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षेत असलेली मुंबई-गोवा वंदे भारत ३ जून रोजी धावणार होती. मात्र आदल्या दिवशी बालासोर येथे रेल्वे अपघात झाल्याने उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. आता २७ जून रोजी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच वंदे भारत गाडय़ांना हिरवा झेंडा दाखविणार आहेत. त्यात मडगाव-मुंबई, पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर, भोपाळ-जबलपूर आणि बंगळूरू-हुबळी-धारवाड यांचा समावेश असेल.१० जूनपासून कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू झाल्याने रेल्वे गाडय़ांचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे वंदे भारतच्या वेगावरही मर्यादा येणार आहे.
विचाराधीन वेळापत्रक
दोन्ही दिशेकडे जाणारी वंदे भारत शुक्रवार वगळता सहा दिवस चालवण्याचे नियोजन आहे. या गाडीला मडगाव, थिवि, कणकवली, रत्नागिरी, खेड, पनवेल, ठाणे, दादर, सीएसएमटी या स्थानकावर ही गाडी थांबेल. ही गाडी सीएसएमटीवरून सकाळी ५.२५ गाडी सुटेल आणि मडगाव येथे दुपारी १.१५ वाजता पोहोचेल. तसेच दुपारी २.३५ वाजता ती मडगाववरून सुटेल आणि सीएसएमटीला रात्री १०.२५ वाजता पोहोचेल.
राज्यातील पहिली लांब पल्ल्याची ‘वंदे भारत’
राज्यात सध्या चार वंदे भारत धावत आहेत. पाचवी वंदे भारत मुंबई-गोवा आशी धावणार आहे. ही गाडी राज्यातील सर्वाधिक लांबीच्या मार्गावर धावणारी पहिली एक्सप्रेस ठरणार आहे. मुंबई ते गोवा ५८६ किमी लांबीचा पल्ला ती आठ तासांत गाठेल. मुंबई-सोलापूर वंदे भारत ४०० किमी, मुंबई -शिर्डी वंदे भारत ३४० आणि मुंबई सेंट्रल -गांधी नगर वंदे भारत ५२० किमी आणि चौथी वंदे भारत नागपूर -बिलासपूर (४१३ किमी) अशी धावते.