मुंबई : मुंबईवरून हिंगोलीला जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये सलग दोन दिवसांपासून बिघाड होत आहे. आटगाव जवळ शुक्रवारी जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. तसेच शनिवारी दादर येथे तांत्रिक बिघाड झाल्याने ही एक्स्प्रेस २५ मिनिटे खोळंबली होती. परिणामी, मध्य रेल्वेकडून करण्यात येणाऱ्या एक्स्प्रेसच्या देखभाल-दुरूस्तीवर प्रवाशांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
हेही वाचा : अतिक्रमणाविरोधात कारवाईपूर्वी महापालिकेने प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे – जितेंद्र आव्हाड
मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथे ब्लॉकनंतरही नाॅन इंटरलाॅकिंगमध्ये त्रुटी असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे एक्स्प्रेस आणि लोकलमधील सुरक्षित अंतर राखण्यासाठी मोठा खोळंबा होत आहे. परिणामी, अनेक लोकल विलंबाने धावत आहेत. तर, नाॅन इंटरलाॅकिंगच्या कामामुळे मेल – एक्स्प्रेस अंशत: रद्द करण्याचे प्रकार सुरू आहेत. याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे. तसेच एक्स्प्रेसची बिघाड मालिका सुरू असल्याने प्रवाशांना रेल्वे प्रवास करणे कठीण झाले आहे. शनिवारी दुपारी १२.४० च्या दरम्यान मध्य रेल्वेवरील दादर येथे गाडी क्रमांक १२०७१ हिंगोली जनशताब्दी एक्स्प्रेस बराच वेळ थांबली होती. एक्स्प्रेस पुढे जात नसल्याने अनेक प्रवासी संभ्रमात पडले होते. त्यामुळे काही प्रवासी एक्स्प्रेसमधून फलाटावर उतरून, एक्स्प्रेस निघण्याची, नेमकी काय समस्या निर्माण झाली आहे याची पाहणी करीत होते. एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, ती पुढे जात नव्हती,असे समजले. त्यानंतर तब्बल २५ मिनिटांनी म्हणजे दुपारी १.०५ वाजता हिंगोली जनशताब्दी एक्स्प्रेस मार्गस्थ झाली. २५ मिनिटांच्या घोळामुळे भायखळा आणि दादरदरम्यान जलद लोकल एका पाठोपाठ एक उभ्या होत्या. तर, शुक्रवारी आटगाव येथे इंजिनमध्ये बिघाड झाल्याने पर्यायी इंजिन पोहचविण्यास दोन तासांचा विलंब झाला. त्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली होती.