मुंबई : गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेने मुंबई ते कुडाळदरम्यान विशेष १८ अतिरिक्त अनारक्षित गणपती विशेष गाडय़ा चालवण्याचे नियोजन केले आहे. यापूर्वी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने सप्टेंबर २०२३ च्या गणेशोत्सवानिमित्त २०८ विशेष रेल्वेगाडय़ा सोडण्याचे जाहीर केले आहे.पश्चिम रेल्वेने ४० विशेष रेल्वे गाडय़ा सोडण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी एकूण २६६ विशेष रेल्वेगाडय़ा धावणार आहेत. गाडी क्रमांक ०११८५ एलटीटी-कुडाळ रेल्वेगाडी १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत दर सोमवार, बुधवारी आणि शनिवारी धावणार आहे. एलटीटी येथून रात्री १२.४५ वाजता रेल्वेगाडी सुटून कुडाळ येथे सकाळी ११.३० वाजता पोहचेल. गाडी क्रमांक ०११८६ कुडाळ येथून दर मंगळवारी, गुरुवारी, रविवारी दुपारी १२.१० वाजता सुटेल आणि रात्री १२.३५ वाजता एलटीटी येथे पोहचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग येथे थांबा असेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
तसेच पश्चिम रेल्वेवरून चालवण्यात येणाऱ्या गाडी क्रमांक ०९००९/०९०१० मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी रेल्वे गाडीच्या ३० फेऱ्या, गाडी क्रमांक ०९०१८/०९०१७ उधना ते मडगाव विशेष रेल्वेगाडीच्या ६ फेऱ्या, गाडी क्रमांक ०९१५०/०९१४९ विश्वामित्री ते कुडाळ विशेष रेल्वेगाडीच्या ४ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. या ४० फेऱ्यांचे तिकीट आरक्षण २७ जुलै रोजीपासून सुरू होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.