मेट्रो रेल्वेच्या कारडेपोच्या जागेचा प्रश्न पर्यावरणाच्या कचाटय़ात सापडल्याने पाच वर्षांपासून कागदावरच असलेल्या चारकोप-वांद्रे-मानखुर्द या दुसऱ्या मेट्रो रेल्वेच्या कामाचा करार रद्द करत असल्याचे ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’च्या अखत्यारीतील ‘मुंबई मेट्रो ट्रान्सपोर्ट प्रा. लि.’ (एमएमटीपीएल) या कंपनीने जाहीर केले आहे. त्यामुळे या दुसऱ्या मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पाची फेरआखणी होणार असून कुलाबा-सीप्झ या तिसऱ्या मेट्रोच्या धर्तीवर दुसरी मेट्रोही भुयारी पद्धतीने होण्याची शक्यता आहे. मात्र या संपूर्ण प्रक्रियेला बराच काळ लागण्याची शक्यता आहे.
चारकोप-मानखुर्द-वांद्रे या सुमारे ३२ किमीच्या मार्गावर दुसरी मेट्रो बांधण्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ला दिले होते. सुमारे १२ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प होता. २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या प्रकल्पाचे भूमिपूजनही तत्कालीन काँग्रेस सरकारने उरकले होते. मात्र तिवरांचे जंगल, सीआरझेडच्या नियमांमुळे चारकोप आणि मानखुर्द येथे कारडेपोच्या उभारणीस परवानगी देण्यास केंद्रीय पर्यावरण खात्याने नकार दिला. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून हा प्रकल्प कागदावरच होता. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या मेट्रोचा करार रद्द करण्याशिवाय दुसरा उपाय नसल्याचे संकेत वेळोवेळी दिले होते. अखेर राज्यात नवीन सरकार आल्यानंतर या प्रश्नाचा निकाल लागला. या प्रकल्पाच्या मार्गातील अडचणी पाच वर्षांत न सुटल्याने अखेर हा प्रकल्प उभारण्याबाबतचा करार रद्द करत असल्याचे ‘रिलायन्स’ने जाहीर केले.
चारकोप-वांद्रे-मानखुर्द मेट्रो रेल्वेची उभारणी व संचालनाबाबत राज्य सरकारशी झालेला करार परस्पर सहमतीने रद्द करण्यात आला आहे. ‘एमएमटीपीएल’तर्फे बँक हमी रक्कम परत मिळण्याबाबतचे पत्र प्राप्त होताच रक्कम परत देण्याची प्रक्रिया केली जाईल.
दिलीप कवठकर, सहप्रकल्प संचालक एमएमआरडीए
मुंबईकरांचे दुसऱ्या मेट्रोचे स्वप्न लांबणीवर
मेट्रो रेल्वेच्या कारडेपोच्या जागेचा प्रश्न पर्यावरणाच्या कचाटय़ात सापडल्याने पाच वर्षांपासून कागदावरच असलेल्या चारकोप-वांद्रे-मानखुर्द या दुसऱ्या मेट्रो रेल्वेच्या कामाचा करार रद्द करत असल्याचे ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’च्या अखत्यारीतील ‘मुंबई मेट्रो ट्रान्सपोर्ट प्रा. लि.’ (एमएमटीपीएल) या कंपनीने जाहीर केले आहे.
First published on: 14-11-2014 at 02:01 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai to wait for second metro