मुंबई : दागिने विक्रीसह गुंतवणुकीचा व्यवसाय करणाऱ्या टोरेस कंपनीकडून फसवणूक झाल्यानंतर गुंतवणूकदारांची आर्थिक कोंडी झाली आहे. किमान गुंतवलेली रक्कम परत मिळावी यासाठी गुंतवणूकदारांचे विविध प्रयत्न सुरू आहेत. ठेवीच्या परतफेडीसाठी हजारो गुंतवणूकदारांनी मंगळवार आणि बुधवारी पोलीस ठाण्यात जाऊन अर्ज केले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तक्रारींचा ओघ सुरूच होता. फसवणूक झालेल्यांत डॉक्टर, अभियंते, विकासक, व्यावसायिक, तसेच अनेक पोलीसही आहेत.
तौफिक रियाझ ऊर्फ जॉन कार्टर, सर्वेश सुर्वे आणि सीए अभिषेक गुप्ता यांनीच गुंतवणूकदारांची फसवणूक केली असून त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करावी आणि त्याचा फोटो कंपनीला पाठवावा, असे केल्यास ७२ तासांत गुंतवणूकदारांना रक्कम परत मिळेल, असा दावा कंपनीच्या अॅपवर करण्यात आला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गर्दी केली होती.
फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. सोमवारपासून रोज टोरेसच्या ग्रांट रोड, मीरा रोड, सानपाडा, कल्याण आणि कांदिवली या ठिकाणच्या शाखांमध्ये गुंतवणूकदार खेटे घालत आहेत.
हेही वाचा : देशातील माता मृत्यूदर २० टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य, स्त्रीरोग तज्ज्ञांची ‘फॉग्सी’ संघटना करणार जनजागृती
आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास
या फसवणूक प्रकरणातील तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी तौफिक शेख आणि सीए अभिषेक गुप्ता दोघेही भारतातच असून ते परदेशात पसार होऊ नयेत, यासाठी त्यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर सीए अभिषेक गुप्ता मंगळवारी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले आहे.