मुंबई : सक्षम पायाभूत सुविधांचे जाळे, दळणवणाच्या उत्तम सुविधा, जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आणि उद्याोग-व्यवसायाचे मुख्य केंद्र अशा सर्वच जमेच्या बाजूंमुळे केवळ राज्याची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी, गुंतवणूक आणि व्यवसायाचे उत्तम आर्थिक केंद्र अशी ओळख असलेल्या मुंबईची विकासात चौफेर घोडदौड सुरू आहे. २०३० पर्यंत मुंबईची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलर करण्याच्या दृष्टीने धोरणे आखली जात आहेत.

मुंबई शहर व उपनगर अशा दोन महसुली जिल्ह्यांत विस्तारलेल्या मुंबईच्या सर्वांगीन प्रगतीमध्ये दोन्ही जिल्हाधिकारी प्रशासनासह महापालिका आणि मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांचे मोठे योगदान आहे. मुंबईत सुमारे १९४१.१६ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यापैकी शहरात ५०६.४६ किलोमीटर, पश्चिम उपनगरात ९२७.६४ किलोमीटर तर पूर्व उपनगरांत ५०७.०६ किलोमीटर लांबीचे लहान-मोठे रस्ते आहेत. खड्डेमुक्त मुंबईसाठी आता सर्वच रस्ते काँक्रीटीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. उपनगरीय रेल्वेबरोबरच पूर्व मुक्त मार्ग, सागरी किनारपट्टी मार्ग, वरळी ते विरारपर्यंतचा सागरी सेतू, मेट्रो मार्गांचे जाळे यांमुळे मुंबई महानगरातील वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा होत आहे.

तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तुळशी आणि विहार या सात धरणांमधून होणाऱ्या प्रतिदिन ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्यामुळे मुंबईत पाणीटंचाईची समस्या फारशी जाणवत नाही. राज्यात दरहजार लोकसंख्येमागे पोलीस आणि पोलीस चौक्यांची संख्या मुंबईत सर्वाधित आहे. सुमारे साडे तीन हजार शाळा आणि ३५० महाविद्यालये तसेत अन्य व्यावसायिक संस्थामुळे मुंबईत उत्पादन किंवा सेवा क्षेत्रासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ सहज उपलब्ध होत असल्याने येथे रोजागाराच्या संधीही खूप आहेत. पर्यटन, कारखानदारी, जेम्स अॅण्ड ज्वेलरी, सेवा क्षेत्रामुळे मुंबईची विकासदर नेहमीच अधिक राहिला आहे.

जिल्हा निर्देशांक चांगला राहण्यासाठी किंंबहुना त्यात वाढ होण्यासाठी महत्त्वाचे ठरणाऱ्या प्राथमिक आणि दुय्यम घटकांवर जिल्हा प्रशासनाने सातत्याने लक्ष केंद्रित केले होते. उद्याोगांची कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने कौशल्य विकास विभागाच्या साह्याने जिल्हा विकास निधीतून तरुणांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करून त्यांना प्रशिक्षण दिले. त्यामुळे तरुणांना रोजगार तर उद्याोगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध झाले. मत्स्य उद्याोगासाठी मुंबईच्या किनाऱ्यावरील छोट्या बंदरांचा विकास करण्यात आला. मासळी सुकविण्याठी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली. यासाठी मच्छीमारांना विविध योजनांच्या माध्यमातून पाठबळ देण्यात आले.राजेंद्र क्षीरसागर, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी