रस्त्यांचे नुकसान झाल्यास गुन्हा दाखल करण्याचे परिवहन आयुक्तांचे आदेश
सुशांत मोरे, मुंबई</strong>
क्षमतेपेक्षा जादा मालवाहतूक करून रस्त्याच्या नुकसानास कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांवर आणि मालकांवर यापुढे गुन्हा दाखल केला जाणार आहे. नियम धाब्यावर बसविणाऱ्या वाहनचालक व मालकांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांना दिले आहेत.
प्रत्येक वाहनातून किती माल वाहून न्यावा, याचे प्रमाण आरटीओने ठरवून दिले आहे. मालवाहू वाहनांच्या नोंदणी प्रमाणपत्रावरच आरटीओ तशी नोंद करते. मात्र मालवाहतूकदार या नियमांचे सर्रास उल्लंघन करतात. क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक केल्यास मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ११३ व ११४ नुसार चालक किंवा मालकाविरोधात कारवाई होते. नियम धुडकावणाऱ्या वाहनातील जादा माल उतरविण्यात येतो आणि तडजोड शुल्क आकारून त्यांना सोडून दिले जाते. वाहनचालक तडजोड शुल्क भरण्यास तयार नसल्यास तो वाद न्यायालयात सोडविला जाई. परंतु आता जादा मालवाहतूक करणाऱ्यांविरोधातील कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
वाहनांमधून क्षमतेपेक्षा जादा माल वाहून नेल्याने रस्त्यांचे नुकसान होते. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे एक याचिका दाखल झाली होती. या याचिकेत या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले होते. ‘प्रिव्हेन्शन ऑफ डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी अॅक्ट, १९८४’च्या तरतुदीनुसार अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी याचिकाकर्त्यांने केली होती. न्यायालयाने २३ ऑगस्ट, २०१७ ला अशा वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. परिवहनने तडजोडीबरोबरच गुन्हा दाखल करून कारवाई तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश सर्व आरटीओ कार्यालयांना दिले आहेत. अशा मालवाहतूकदारांवर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाईल. प्रिव्हेन्शन ऑफ डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला जाईल.
उड्डाणपुलांना धोका
अवजड वाहने उड्डाणपुलांचाही वापर करतात. नियम बासनात गुंडाळून माल वाहतूक करणाऱ्या अशा वाहनांमुळे पुलांना धोका संभवतो. कारवाईमुळे पुलावरील वाहतुकीलाही आळा बसेल.
क्षमतेपेक्षा जादा मालवाहतूक केल्याने रस्त्यांचे नुकसान होते. नियम धुडकावणाऱ्या वाहनचालकांवर आरटीओ गुन्हा दाखल करणार आहे.
– शेखर चन्ने, परिवहन आयुक्त