मुंबईतील सात ठिकाणी रस्त्यांवर रात्री ११ ते १ या वेळेत कार शर्यती करणाऱ्या आणि ‘धूम’ स्टाइल बाइक उडविणाऱ्या ‘सुसाटस्वारां’वर वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. शर्यतीमध्ये कोण जिंकणार, यावर जुगार आणि अगदी गाडी बक्षीस देण्यापर्यंत या बाइकस्वारांची मजल गेली आहे. गेल्या आठ महिन्यांत वाहन चालकांविरुद्ध साडेचार लाख गुन्हे व तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत़ त्यांच्याकडून तब्बल चार कोटी रुपये दंडवसुली केली असल्याची माहिती गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी
दिली.
पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, मरिन ड्राइव्ह, ओशिवरा बॅक रोड, वरळी सीफेस, बँडस्टँड, कार्टर रस्ता अशा सात ठिकाणी वाहतूक पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. तेथे रात्री उशीरा कारच्या शर्यती होतात. वेगमर्यादा ओलांडून गाडय़ा चालविणारे बेदरकार वाहनचालक, मद्यपान करून गाडय़ा चालणिारे, सिग्नल तोडणारे वाहनचालक या सर्वाविरुद्ध वाहतूक पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. विशेषत: दुचाकीस्वारांवर मोठय़ा प्रमाणावर कारवाई केली असून मोबाइल चोरी, सोनसाखळी चोरणे आदी गुन्ह्य़ांसाठी मोटरसायकली वापरल्या जात आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांचे लक्ष अधिक आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.
याआधी बेदरकार वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध केवळ मोटरवाहन कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई होत असे. आता भारतीय दंडविधानातील कलम २७९ नुसारही कारवाई
केली जात असून त्यानुसार दोन वर्षे तुरुंगवासाचीही शिक्षा आहे.
मद्य पिऊन गाडी चालविणाऱ्या १०१६७ वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई केली असून त्यामध्ये ६५८४ बाइकस्वार असल्याची माहिती उपायुक्त प्रताप दिघावकर यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा