मुंबईः नियमभंग करणाऱ्या ई – बाईक चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून या मोहिमेअंतर्गत ११ दिवसांत ६७२ ई – बाईक्स जप्त करण्यात आल्या. तसेच खाद्यपदार्थ घरपोच करणाऱ्या १८० दुचाकी वाहनावर ई-चलान कारवाई करण्यात आली. मुंबईमध्ये घरोघरी खाद्यपदार्थ पोहोचविण्याचे काम करणारे अनेक तरुण भरधाव वेगात दुचाकी चालवून नियमभंग करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
हेही वाचा >>> मालाड परिसरात २५ वर्षीय महिलेची हत्या; आरोपी पतीला अटक
सिग्नल न पाळणे, हेल्मेट न वापरणे, विरुद्ध दिशने वाहन चालवणे, मर्यादेपेक्षा वेगाने दुचाकी हाकणे या नियमभंगांबाबत वाहतूक पोलिसांकडे तक्रारी येत होत्या. अलीकडे या तक्रारींचा ओघ वाढला होता. ई – बाईकविरोधात वाहतूक विभागाने १८ ते २९ डिसेंबर रोजी राबविलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत १८१ गुन्हे नोंदवून ६७२ ई-बाईकस् जप्त करण्यात आल्या. तसेच मोटार वाहन कायद्यान्वये खाद्यपदार्थ घरपोच करणाऱ्यांच्या १८० दुचाकी वाहनावर ई-चलान कारवाई करण्यात आली.
हेही वाचा >>> नववर्षात कोकण रेल्वेवरील विशेष रेल्वेगाडीच्या सेवेत वाढ
दरम्यान, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारे ई-बाईकस् चालक व डिलेव्हरी बॉयची नागरिकांनी मुंबई वाहतूक नियंत्रण शाखेच्या हेल्पलाईनवर तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.