मुंबई : मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश स्वच्छ, सुंदर तसेच झोपडपट्टीमुक्त करण्याचे राज्य सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक ती सर्व मदत सरकारकडून करण्यात येईल. सरकार बदलले, आता मुंबईतही परिवर्तन घडेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
हेही वाचा >>> महाराष्ट्राच्या राजकारणात केलेला नवा प्रयोग जनतेला मान्य – शहाजी पाटील
लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आणि ‘कन्स्ट्रक्शन टाईम्स’च्या सहकार्याने शनिवारी मुंबईच्या फोर सिझन हॉटेलमध्ये ‘मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन अॅक्ट २०३४’ या विशेष एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. या परिषदेत मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाच्या सर्वागीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा घेणारी, तसेच समस्या सोडविण्यासाठी या परिषदेत सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांची श्वेतपत्रिका मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आली.
हेही वाचा >>> अजित पवार यांच्या अडचणी वाढणार?; शिखर बँक घोटाळय़ाचा पुढील तपास सुरू
‘‘मुंबईत झोपडपट्टय़ांचा प्रश्न फार मोठा आहे. आजही मुंबईतील ६० टक्के जनता झोपडपट्टीत राहते. २०५२ मध्ये हे प्रमाण आणखी वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई आणि त्याबरोबरीने मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टीमुक्त करणे हे या सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी झोपु योजनांना गती देण्यात येईल,’’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बेस्ट आणि एसटी आगारांच्या जागांचा वापर ‘झोपु’ योजनांसाठी करण्याचा विचार पुढे आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. धारावी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावला जात आहे. हा प्रकल्प पूर्ण केल्यानंतर मुंबई झोपडपट्टीमुक्त होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचा >>> ‘सीटबेल्ट’ नसल्यास वाहन योग्यता प्रमाणपत्रास नकार?; ‘आरटीओ’कडून नव्या नियमाचा विचार
स्वच्छ महाराष्ट्र अभियान
केंद्र सरकारच्या मदतीने ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ राबविले जात असून आता या अभियानाचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान-२’साठी केंद्र सरकारने नुकतेच १२ हजार ९०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
‘दळणवळण मजबुतीवर भर’
मुंबईसह संपूर्ण राज्यातील दळणवळण सेवा मजबूत करण्यासाठी ५००० कि.मी.चे द्रुतगती महामार्गाचे जाळे विणण्यात येणार आहे. तर सध्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम वेगात सुरू आहे. लवकरच त्याच्या एका टप्प्याचे उद्घाटन होईल. समृद्धीचा विस्तारही करण्यात येत आहे. मुंबई – सिंधुदुर्ग द्रुतगती महामार्गही बांधण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील दळणवळण सेवाही मजबूत होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
रस्ते खड्डेमुक्त
- मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डय़ांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी सर्व रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
- त्यानुसार मुंबईतील एक हजार कि.मी.च्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. यापैकी ४५० कि.मी.च्या रस्त्यांच्या कामासाठी महापालिकेने निविदा मागविल्या आहेत.
- या कामाला लवकरच सुरुवात होईल. तसेच उर्वरित ४५०-५०० कि.मी.च्या रस्त्यांच्या कामासाठीही लवकरच निविदा काढण्यात येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पंतप्रधान मोदींचे कौतुक
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाचा सर्वागीण विकास करण्यासाठी सरकार विविध प्रकल्प राबवत आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीची गरज असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची याबाबतीत मदत होत आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी आवश्यक ती मदत करू, कुठेही निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले. त्यानुसार निधी मिळत असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे कौतुक केले.
२०२६पर्यंत वाहतूक कोंडीतून सुटका
‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून ३३७ कि.मी.चे मेट्रोचे जाळे विणले जात असून हा संपूर्ण प्रकल्प २०२६ पर्यंत पूर्ण होईल. यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होईल. मेट्रोमुळे रस्त्यावरील ४० लाख वाहने कमी होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.