मालाडमध्ये खासगी क्लासेस चालवणाऱ्या दोन शिक्षकांमधील वादाने शुक्रवारी रक्तरंजित वळण घेतले. विजय हरिजन या ट्यूशन टिचरने अरुप बिश्वास यांची हत्या केली असून हत्येनंतर आरोपी स्वतःच पोलिसांना शरण गेला.
मालाडमध्ये राहणारे अरुप बिश्वास आणि विजय हरिजन हे दोघे खासगी क्लास चालवत होते. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये विद्यार्थ्यांवरुन वाद सुरु होता.
A tuition teacher in Mumbai's Malad was stabbed to death by another tuition teacher yesterday. The accused later surrendered before the police after committing the crime. Investigation underway pic.twitter.com/mkVQYZMm5h
— ANI (@ANI) February 2, 2018
विजय हरिजन यांच्या क्लासमधील १० विद्यार्थ्यांनी अरुप बिश्वास यांच्या क्लासमध्ये प्रवेश घेतला होता. यामुळे विजय संतापला होता. अरुप गुरुवारी संध्याकाळी घराजवळ बसले असताना विजयने त्यांना गाठले. दोघांमध्ये वाद झाला आणि यानंतर विजयने चाकूने अरुप यांच्यावर वार केले. या हल्ल्यात अरुप यांचा मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर विजय तिथून पळून गेला. मात्र, काही वेळाने तो स्वतःच पोलिसांना शरण गेला. पोलिसांनी विजयविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थी अरुप बिश्वास यांच्या क्लासमध्ये गेल्याचे विजयला सहन होत नव्हते. यामुळेच त्याने ही हत्या केली, असे पोलिसांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला सांगितले.