गेला आठवडाभर मुंबईकरांच्या मदतीला धावून आलेल्य अरबी समुद्रातील वाऱ्यांचा प्रभाव आता कमी होणार असून पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसनी वाढ होण्याची शक्यता आहे.
मार्चच्या पहिल्या पंधरवडय़ात कोरडय़ा हवेतील भाजून निघालेल्या मुंबईचे तापमान समुद्रावरील दमट व तुलनेने थंड वाऱ्यांनी खाली आणले होते. बाष्पयुक्त हवेमुळे घामेजून जाण्याचे प्रमाण वाढले असले तरी दुपारचे तापमानही ३२ ते ३३ अंश सें.च्या आत राहत होते. शुक्रवारीही कुलाबा येथे २९.५ अंश सें., तर सांताक्रूझ येथे ३२.२ अंश सें. तापमान होते. दुपार होण्याच्या आधीच समुद्रावरील वारे जमिनीवर येत असल्याने तापमानावर अंकुश राहिला असल्याचे वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव संध्याकाळपर्यंतच राहत असल्याने रात्रीचे तापमान मात्र अंशाअंशांनी वाढत आहे. शुक्रवारी सांताक्रूझ येथे २३.४ अंश सें. किमान तापमान होते. ‘उन्हाळ्याच्या ऋतूत किमान व कमाल या दोन्ही तापमानांत वाढ होत असते. सध्या समुद्रावरील वारे सकाळी लवकर वाहण्यास सुरुवात होत असल्याने दुपारचे तापमान फारसे वाढत नाही.
दोन दिवसांत या वाऱ्यांचा प्रभाव कमी होणार असून तापमानात वाढ होईल,’ असे मुंबई हवामानशास्त्र विभागाचे संचालक व्ही. के. राजीव यांनी सांगितले. शनिवारी कमाल तापमान ३४ अंश, तर रविवारी ३६ अंश सें.पर्यंत जाणार असल्याचा अंदाज आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा