इंद्रायणी नार्वेकर

साध्या सुती कापडाची मुखपट्टी वापरणाऱ्यांनी या मुखपट्टीच्या आत ‘सर्जिकल’ अर्थात वैद्यकीय उपचारांदरम्यान लावण्यात येणारी मुखपट्टी वापरावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. एन ९५ मुखपट्टी व वैद्यकीय मुखपट्टी यांमुळे ९५ टक्के संरक्षण मिळते, तर सुती मुखपट्टीमुळे शून्य टक्के संरक्षण मिळते, असा दावाही पालिकेच्या ‘माय बीएमसी’ या अधिकृत ‘ट्विटर हॅण्डल’वरून करण्यात आला. मात्र हे आवाहन कशाच्या आधारावर केले, असा प्रश्न उपस्थित करत अनेक नागरिकांनी त्यावर आक्षेप नोंदवला आहे.

एन ९५ मुखपट्टीची जाहिरात यातून करायची आहे का, तसेच एक मुखपट्टी लावून वावरणेही जिकिरीचे होत असताना दोन मुखपट्ट्या लावून कसे वावरायचे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. दरम्यान ‘सुती कापडाच्या मुखपट्ट्या वापरणेही सुरक्षित आहे. मात्र अनेक नागरिक मुखपट्टीचा वापर करताना सतत ती काढून वावरत असल्याने किंवा तिचा योग्य वापर करीत नसल्याने मूळ हेतू साध्य होत नाही. म्हणून एका मुखपट्टीच्या आत आणखी एका मुखपट्टीचा समावेश असावा, असे आवाहन करण्यात आले आहे,’ असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. अनेकदा नागरिक रुग्णालयात, लसीकरण केंद्रावर येतात, पण मुखपट्टी नीट लावलेली नसते, त्यामुळे हे आवाहन करण्यात आल्याचेही ते म्हणाले. मुंबईत विनामुखपट्टी फिरणाऱ्यांविरोधात कारवाई के ल्यामुळे नागरिकांमध्ये मुखपट्टी लावण्याबाबत जागृती निर्माण झाली आहे, मुंबईतील रुग्णसंख्या ओसरण्यामागे हेदेखील मोठे कारण आहे, अशी प्रतिक्रिया पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी व्यक्त के ली.

५४ कोटींचा दंड वसूल…

पालिके ने गेल्या एप्रिलपासून विनामुखपट्टी फिरणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू केली. मुंबईकर दंडाच्या भीतीने मुखपट्टी लावत असले तरी अनेकदा ही मुखपट्टी हनुवटीवर किं वा नाकाखाली सरकवलेली असते. ऑक्टोबरमध्ये पहिली लाट ओसरल्यानंतर ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली. पालिके ने आतापर्यंत २७ लाख लोकांवर कारवाई करून आतापर्यंत ५४ कोटींचा दंड वसूल केला आहे.

Story img Loader