मुंबई : मुंबईतील नालेसफाई संदर्भातील न्यायालयीन याचिकेचा अडथळा दूर झाल्याने नालेसफाईच्या मार्ग मोकळा झाल्याने येत्या २५ मार्चपासून मुंबईत नालेसफाईला सुरुवात करण्यात येणार आहे. मात्र, पावसाळा सुरु होण्यासाठी केवळ दोन महिने उरले असताना नाले सफाईची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी म्हणजेच ३१ मे पर्यंत नालेसफाईची ७५ टक्के कामे पूर्ण होणार का याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

विलंबामुळे नालेसफाई अपूर्णच ; मुंबईची तुंबई पावसाळयात नाले तुंबून मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी महानगरपालिका प्रशासनातर्फे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते. नालेसफाईतील ७५ टक्के कामे पावसाळ्यापूर्वी केली जातात. तसेच, उर्वरित २५ टक्क्यांपैकी १५ टक्के गाळ पावसाळ्यादरम्यान तर, १० टक्के गाळ पावसाळ्यानंतर काढला जातो. या कामांना मार्च महिन्यात सुरुवात होते. मात्र, यंदा नालेसफाईच्या निविदा प्रक्रियेला विलंब झाला. त्यातच निविदा प्रक्रिया न्यायालयीन वादात सापडल्याने या कामांना आणखी वेळ लागला. न्यायालयीन सुनावणीचा प्रश्न मार्गी लागल्याने अखेर नालेसफाईच्या कामांना पुढील आठवड्यात सुरुवात करण्यात येणार आहे. मात्र वेळेत नालेसफाई न झाल्यास अनेक भागांत पाणी तुंबण्याचा धोका आहे.

नगरसेवकांची नाराजी…

नालेसफाईच्या कामातील विलंबाबाबत रवी राजा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महानगरपालिका प्रशासन नालेसफाईची कामे नेहमी उशिरा हाती घेते. त्यामुळे नाल्यातील गाळ काढण्याचे काम पूर्णच होत नाही. परिणामी, मुंबईत पाणी साचते, असेही मत त्यांनी व्यक्त केले. शिवाय चढ्या दराने निविदा भरणाऱ्या कंत्राटदारांसोबत वाटाघाटी करून सुरु करण्यात येणारी नालेसफाईची ७५ टक्के कामे ३१ मेपर्यंत पूर्ण कशी होणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. महापालिका दरवर्षी नालेसफाईच्या निविदा वेळेत का काढत नाही. समबंधित कामे जानेवारीपासून सुरु झाली, तरच ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण होऊ शकतात. याची कल्पना असूनही महापालिका दरवर्षी या कामांना का विलंब करते आदी प्रश्न विचारात पालिकेच्या कामकाजाबाबत रवी राजा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नालेसफाईतील अडथळे दूर

नालेसफाईसाठी महापालिका प्रशासनाने जानेवारी अखेरीस निविदा मागवल्या. मोठे नाले, लहान नाले, भूमिगत गटारे, मिठी नदी यांच्यातील गाळ काढण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. संबंधित कामांसाठी एकूण २६ विविध निविदा परिमंडळाप्रमाणे मागवण्यात आल्या. प्रथमच दोन वर्षांसाठी कंत्राटदार नेमण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या असून या कामांचा खर्च सुमारे ५४० कोटी आहे. मात्र, मिठी नदीतील गाळ काढण्याच्या निविदा प्रक्रियेत एक विशिष्ट अट टाकल्यामुळे या निविदाप्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप राजकीय पक्षांनी केला होता. तसेच काही कंत्राटदारांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने कंत्राटदारांची याचिका फेटाळल्यामुळे नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचा पालिका प्रशासनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Story img Loader