सध्या देशभरात सुरू असलेल्या अभुतपूर्व चलनटंचाईच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत एटीएम व्हॅनवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. वांद्रे परिसरात दोन अज्ञात इसमांनी ही व्हॅन लुटण्याचा प्रयत्न केला. आयसीआयसीआय बँकेच्या पाली नाका एटीएमजवळ हा प्रकार घडला. मात्र एटीएमच्या सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधनामुळे हा प्रयत्न फसला.
यावेळी अज्ञात व्यक्तींनी सुरक्षारक्षकाला चाकूचा धाक दाखवला. मात्र, सुरक्षारक्षकाने चपळाईने बंदूक बाहेर काढल्याने या दोन्ही दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. त्यानंतर सुरक्षारक्षकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या व्यक्तींचा शोध सुरू केला असून अद्याप आरोपींची ओळख पटू शकलेली नाही.नोटांबदीच्या पार्श्वभूमीवर या घटनेला वेगळे महत्त्वा प्राप्त झाले आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांचा शोध सुरु आहे.

दरम्यान नोटाबंदीच्या निर्णयामुळे चलनामुळे निर्माण झालेली चलनटंचाई दूर करण्यासाठी सरकारकडून अनेक उपाय योजण्यात आले आहेत. १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीतील कर्जफेडीस ६० दिवसांची मुदतवाढ, कॅशक्रेडिट खातेधारकांना व ओव्हरड्राफ्ट खातेधारकांना आठवडय़ाला ५० हजार रुपये काढण्याची मुभा, सरकारी बियाणे केंद्रांवर पाचशे व हजार रुपयांच्या जुन्या नोटा देऊन बियाणे खरेदीची शेतकऱ्यांना सवलत, शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या कामासाठी आवश्यक निधी सहकारी बँकांमार्फत उपलब्ध करून देण्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आदेश, क वर्गातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना येत्या पगारातील १० हजार रुपये रोखीने आधीच देण्यास प्रारंभ, असे अनेक उपाय सरकारकडून जाहीर करण्यात आले आहेत.

Story img Loader