मुंबई : गेल्या वर्षभरापासून मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी प्रभारी अधिकारी कार्यरत असल्यामुळे निकाल गोंधळ उडत असून संचालकपदी पूर्णवेळ अधिकाऱ्याची तात्काळ नियुक्ती करण्याची मागणी विद्यार्थी संघटनांकडून सातत्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदासाठी अलीकडेच मुलाखती घेऊनही निवड समितीने कोणत्याही उमेदवाराच्या नावाची शिफारसच केली नव्हती. त्यामुळे या पदासाठी विद्यापीठाने पुन्हा नव्याने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आता या पदासाठी गुरुवार, २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत https://mu.ac.in/carees या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहे. आता या नव्या निवड प्रक्रियेतून संचालकपदी योग्य व्यक्तीची पूर्णवेळ निवड होईल आणि निकाल गोंधळ सुटेल, अशी अपेक्षा विद्यार्थी संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : धरणांमध्ये पुरेसा जलसाठा असतानाही चेंबूरमधील डोंगराळ भागात पाण्याची चणचण
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदासह (अनुदानित – खुला प्रवर्ग), विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील म्हणजेच ‘आयडॉल’चे संचालकपद (विनाअनुदानित – खुला प्रवर्ग), प्राध्यापक संगणक शास्त्र विभाग (विनाअनुदानित – खुला प्रवर्ग), प्राध्यापक माहिती व तंत्रज्ञान विभाग (विनाअनुदानित – खुला प्रवर्ग), मुख्य कार्यकारी अधिकारी नवशोधन केंद्र (विनाअनुदानित – खुला प्रवर्ग) या पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून गुरुवार, २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. या सर्व पदांकरिता विहित नमुन्यातील अर्ज, शुल्क, शैक्षणिक अर्हता, अनुभव, नियम व अटी आदी सविस्तर माहिती विद्यापीठाच्या http://www.mu.ac.in या संकेतस्थळावरील ‘Careers’ या लिंकवर उपलब्ध आहे.