मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२३ मध्ये घेतलेल्या हिवाळी सत्रातील पदवीच्या बी.ए, बी.कॉम, बी.एस्सी, बी.फार्म, बी.आर्च या अभ्यासक्रमांसह ७५ पैकी ७२ परीक्षांचे निकाल ३० दिवसांच्या आत जाहीर केले आहेत. तर ३ परीक्षांचे निकाल ४५ दिवसांत जाहीर करण्यात आले.
मुंबई विद्यापीठात उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम संगणक आधारित प्रणाली म्हणजेच ‘ऑन स्क्रीन मार्किंग’च्या माध्यमातून करण्यात येते. हिवाळी सत्राच्या एकूण ४३९ परीक्षा आहेत. एकूण ७ लाख ९४ हजार ३१२ उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी प्राप्त झाल्यापासून आजपर्यंत ६ लाख ७८ हजार १८४ उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. तब्बल ६८ हजार ६५७ शिक्षकांनी उत्तरपत्रिका वेळेत तपासल्या. त्यामध्ये मानव्यशास्त्र विद्याशाखेचे १७ हजार ८८७, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे २६ हजार ६३०, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे १७ हजार १०३ आणि आंतरविद्या शाखेचा ७ हजार ३७ शिक्षकांचा समावेश आहे.
हेही वाचा >>>मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर उद्या दोन तासांचा वाहतूक ब्लॉक
आजपर्यंत पदवी स्तरावरील १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल निर्धारित वेळेत जाहीर करण्यात आले असून उर्वरित परीक्षांचे निकालही निर्धारित वेळेत जाहीर करण्यात येतील, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी स्पष्ट केले.